Take a fresh look at your lifestyle.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात एफआयआर दाखल !

जाणून घ्या, नेमकं प्रकरण काय ?

नवी दिल्ली : आपल्या वेगवेगळया विधानांमुळे विरोधी पक्ष भाजपाला सळो की पळो करुन सोडणारे शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.राऊत यांच्याविरोधात आता दिल्लीत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी भाजपाविरोधात केलेल्या वक्तव्याने त्यांच्याविरोधात ही तक्रार नोंदवण्यात आली आहे. 
भाजपाच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या सरचिटणीस दिप्ती रावत भारद्वाज यांनी ९ डिसेंबरला राऊतांविरोधात तक्रार दाखल केली. त्यावरुन आता १२ डिसेंबरला एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
खासदार संजय राऊत यांनी एका मुलाखतीत भाजपा कार्यकर्त्यांविरोधात अपशब्द वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिल्लीच्या मंडावली पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती.संजय राऊतांविरोधात कलम ५०० आणि ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. महिलांचा अवमान केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय राऊतांनी भाजपा कार्यकर्त्यांविरोधात अपशब्द वापरले होते. त्यात महिलांबाबतही चुकीचे शब्द होते. त्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय राऊत लोकप्रतिनिधी असून त्यांची समाजाबद्दलची जबाबदारी सर्वसामान्यांपेक्षा अधिक आहे. तेच असे बेजबाबदार विधान करत असतील तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी दिप्ती रावत भारद्वाज यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांच्या विधानावरुन वादंग सुरु आहे. अद्याप राऊतांनी याबाबत माफी मागितली नाही. मात्र आता पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.
▪️मी वापरलेला ‘तो’ शब्द योग्यच, काय तक्रार करायची ती करा !
खा.संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना टीकाकारांना ‘**या’ असा शब्द वापरला होता. त्यानंतर भाजपाने त्यावर आक्षेप घेऊन राऊतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले होते की, या अशिक्षित आणि अडाणी लोकांना काही कळत नाही. हे लोक हिंदी भाषेचा फार आग्रह धरत असतात, पण राष्ट्र भाषेचे काही शब्दकोश पाहिले तर मी वापरलेला शब्द चुकीचा नसून त्याचा अर्थ अनेक ठिकाणी मूर्ख असा आहे असा दावा राऊत यांनी केला होता.