Take a fresh look at your lifestyle.

सैनिक सहकारी बँकेत पुन्हा नातेवाईकांसाठीच नोकर भरतीचा घाट !

अन्याय निर्मूलन सेवा समितीचा उपोषणाचा इशारा.

पारनेर :संचालकांच्या नातेवाईकांना बँकेच्या सेवेत घेण्यासाठी पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेने नोकर भरतीचा प्रस्ताव सहकार खात्याकडे पाठवला आहे.त्यामुळे बँकेच्या नोकर भरती प्रस्तावास सहकार आयुक्तांनी परवानगी देऊ नये असे पत्र अन्याय निर्मूलन सेवा समितीचे अध्यक्ष अरुण रोडे यांनी सहकार आयुक्तांना दिले आहे.
सहकार आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या चेअरमन व मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी काही संचालकांना हाताशी धरत आपल्या नातेवाईकांना बँकेच्या सेवेत घेण्यासाठी संचालक मंडळाच्या मासिक सभेत ठराव घेऊन आयुक्त कार्यालयात तात्पुरत्या नोकरभरतीचा प्रस्ताव पाठवला आहे. सत्ताधारी संचालक मंडळाने स्वतःच्या आर्थिक हितासाठी मोठ्या प्रमाणावर नातेवाईक नोकरभरती करण्याचा घाट घातला आहे.
स्थानिक वृत्तपत्रात दिलेल्या जाहिराती मध्ये किती जागा भराव्याच्या आहेत याचा उल्लेख केला नाही. तसेच वसुलीसाठी तात्पुरती भरती करणार असल्याचे म्हटले आहे व सदर भरतीस मेलवर अर्ज मागितले आहेत त्यामुळे ही भरती ऑनलाईन भरती कशी ? यात सहकार विभागाची व सर्वसामान्य बेरोजगार युवकांची दिशाभूल करण्याचा डाव बँकेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्याने दिलेल्या जाहिरातीत दिसून येत आहे. २०२० साली झालेल्या कर्मचारी भरतीत अर्थपूर्ण व्यवहार झालेले होते त्यामूळे सदर नोकर भरती रद्द करावी लागली होती.
बँकेचे चेअरमन शिवाजी व्यवहारे यांच्या मुलाचे औरंगाबाद उच्च न्यायालयात नोकर भरती चा वाद चालू असताना पुन्हा भरतीचा अर्ज स्वीकारून उच्च न्यायालयाचा अवमान केला आहे.या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपलेला आहे.तसेच जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बँकेच्या संचालक मंडळाने पाच वर्षात केलेल्या गैरकारभाराची तक्रार केली होती त्यानुसार सहकार आयुक्तांनी तक्रारीची दखल घेऊन विभागीय आयुक्त आर. सी. शहा यांना चौकशीसाठी नियुक्त केले आहे. असे असतानाही केवळ मागील काढलेल्या नातेवाईकांना पुन्हा भरण्यासाठी या काळजीवाहू संचालक मंडळाचा नोकर भरतीचा निर्णय आहे.
संचालक मंडळास येत्या निवडणूकीत फायदा होण्यासाठी ही भरती करण्याचा घाट घालण्यात आला आहे.भरती मुळे बँकेवर आर्थिक बोजा वाढणार आहे व त्यामुळे बँक नुकसानीत जाण्याची शक्यता आहे.त्यामुळे अवैध भरतीस कोणतीही परवानगी देऊ नये.नोकर भरतीस परवानगी दिल्यास व या संचालकांनी नातेवाईकांना सेवेत घेतल्यास सहकार आयुक्त कार्यालया पुणे यांचे समोर बँकेचे संस्थापक पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२० डिसेंबर रोजी उपोषणाला बसणार असल्याचे पत्रात नमूद केले आहे.