Take a fresh look at your lifestyle.

… तर नरेंद्र मोदी सरकारही पडू शकते !

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा इशारा.

राळेगणसिध्दी : पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा याच मागे सर्व राजकीय पक्ष पळत आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षापासून देशाला उज्ज्वल भविष्य नसल्याचे सांगत स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार असा घेऊन अनेक राजकीय पक्ष काम करीत आहेत. जसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोखायला एकच उपाय आहे तो म्हणजे जनशक्तीचा दबाव. देशातील जनता जागी होवून जनतेने दबाव निर्माण केल्यास मोदी सरकारही पडू शकते असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला.

राळेगणसिध्दी येथे आज झालेल्या कार्यकर्त्यांच्या राष्ट्रीय शिबिरात मार्गदर्शन करताना हजारे बोलत होते.यावेळी देशभरातील 14 राज्यातील 86 कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय शिबिरात सहभाग घेतला होता. जगदीश प्रसाद सोलंकी (दिल्ली), रामपाल जाट ( राजस्थान) भोपालसिंह चौधरी (उत्तराखंड), कल्पना इनामदार (मुंबई) योगेंद्र पारीख (राजस्थान), अशोक सब्बन (महाराष्ट्र), दशरथ भाई (राजस्थान), विकल पचार (हरियाणा), विष्णू प्रसाद बराल (आसाम), दयानंद पाटील (कर्नाटक) प्रविण भारतीय (उत्तर प्रदेश), अशोक मालिक (हरियाणा) आदींसह देशभरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही पक्ष व पार्टीकडून देशाचे उज्ज्वल भवितव्य नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, किरण बेदी यांना मी म्हणालो होतो, 2011ला संघटन व आमच्यावर लोकांनी विश्वास केला होता. राजकीय व्यक्तींवर जनशक्तीच दबाव निर्माण करण्यात लोकशाहीचा विजय आहे, असे मी सांगत होतो. मात्र एका रात्रीत केजरीवालांच्या डोक्यात मुख्यमंत्रीपदाचे भूत घुसले. देश वाचवायचा असेल तर संघटनच करावे लागेल. संघटनमध्ये संख्यात्मतेपेक्षा गुणात्मकता हवी. चांगले गुणात्मक लोक संघटनेत हवेत असेही अण्णा हजारे म्हणाले.

हे लोकायुक्त व लोकपाल हे अनुक्रमे मुख्यमंत्री व पंतप्रधान ठरवितात. त्यामुळे ते जे म्हणतील त्या प्रमाणेच ते वागत आहेत. लोकायुक्त व लोकपाल कायद्यानुसार ही पदे असायला हवीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकपालला कमजोर केले. लोकपालसाठी आम्ही मोठे आंदोलन केले होते. आता लोकायुक्तसाठी राज्यात आंदोलन करायचे आहे. कार्यकर्त्यांना विनंती आहे की, प्रत्येक राज्यात संघटन उभे करून लोकायुक्त आणा. म्हणजे समस्या सुटतील असेही श्री.हजारे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.