Take a fresh look at your lifestyle.

विकार नियंत्रित रहाण्यासाठी काय कराल ?

ह्रदयामधल्या रामाला जागवावं लागेल !

ग्रंथ आम्हाला समर्थ जीवन कसं जगावं याचं मार्गदर्शन करतात.अनेकदा बंधन घालून आम्ही जगु पहातो.पण ते अधिकच त्रासदायक होते.मला चहाची खूप आवड आहे पण चार जणांमधे ठणकावून सांगितलं की आता मी चहा सोडला.पण आतंरिक ओढ संपलेली नसेल तर असं बंधन त्रासदायक ठरणार.भोग घेणे हा मनुष्यजातीचा स्वभाव आहे. आणि नाश होण्याचं ते मोठ कारणही आहे. माऊलींनी अत्यंत सोप्या भाषेत इंद्रिय निग्रह कसा करावा हे सांगितले आहे.
इंद्रिया न कोंडी।
भोगासी न सोडी।
अभिमान न सोडी।
स्वजातीचा।
कुळधर्म ते आचरुन।
विधीनिषेध ते पाळुन।
सर्व सुखे भोगुन।
मुक्ती आहे।।
किती सहज मुक्तीपदाला जाण्याचा मार्ग माऊलींनी सांगितला आहे. इंद्रिया न कोंडी याचा अर्थ कोणत्याही गोष्टीचं दमन एक दिवस विस्फोटक ठरते.त्यातही शरीरधर्मानुसार तारुण्यात इंद्रियांचा प्रभाव वाढत चालतो. मग चिभेचे चोचले पुरवणे,डोळ्यांना उत्तम पर्यटन स्थळे पहाण्याची इच्छा पुरवणे,कानांना सुंदर ऐकण्याची इच्छा होणे,मनोवांछित ठिकाणी पाय आपोआप वळतात.
तरीही यामधे उपस्थ इंद्रिय विकार हा मोठा कठीण आहे. याचं दमन केलं असता बलात्कारा सारख्या घटना न घडतील तरच नवल.यासाठी विवाहसंस्था आहे.
माऊली म्हणतात भोगाशी न सोडी।
नित्य भोग भोगणे हे शरिरधर्मानुसार अपरिहार्य आहे.
मग त्यासाठी उपायही सांगितला आहे.
स्वधर्म ते आचरुन।
विधीनिषेध ते पाळुन।
सर्व सुखे भोगुन।
मुक्ती आहे.

स्वधर्माचं पालन यात विकारांना ताब्यात ठेवण्याची क्षमता आहे. त्यापैकी प्रमुख आहे ती विवाहसंस्था.
सज्जनहो आपण आपल्या पाल्यांना उच्चशिक्षित करण्याला प्राधान्य जरुर द्यावे पण वयमान लक्षात ठेवा. विवाह हा योग्य वेळी झाला तर आनंदी जीवन जगण्याची मजा त्यांना घेता येईल. मुलींना तिशीच्या आत मातृत्व मिळाले तर मुल निरोगी जन्माला येतातच शिवाय निरोगी मातृत्व लाभते.मातापिता वृद्ध होतात तेव्हा त्यांची मुलं सक्षम झालेली असतील तरच वृध्दापकाळी उदरनिर्वाहाची चिंता रहाणार नाही. पण हे गणित हुकले की पुढील सगळेच बिघडले म्हणून समजा.
मुक्ती या शब्दाचा अर्थ प्रापंचिकाने सात्विक परिपुर्ण जीवन असा घ्यायला हवा.

विकार हाता बाहेर गेले नाही की मग जीवन सात्विक होतेच.कालच्या भागात आपण पराविया नारी रखुमाई समान यावर चिंतन केले आहे.
माऊलींचा प्रत्येक शब्द जगावं कसं हे शिकवतो.
तो देव आपल्या आतच आहे.तैसा ह्रदयामधे मी रामु।असता सर्व सुखाचा आरामु।की भ्रांताशी कामु।विषयावरी।।त्याला जागवता आलं पाहिजे.आपण थोडा तरी प्रयत्न केला पाहिजे.मी या वाटेवरचा पांथस्थ आहे. थोडंजरी जमलं तरी आनंद आभाळभर आहे.
रामकृष्णहरी