Take a fresh look at your lifestyle.

दोन पाहूणे मात्र आजवर घराबाहेरच ठेवले आहेत ताटकळत !

डॉ.अमोल कोल्हे यांनी पत्नीसाठी पोस्ट केली शेअर.

 

शिरूर : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे खासदार, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या लग्नाला १४ वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमित्ताने त्यांनी पत्नी अश्विनी यांना उद्देशून सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.
डॉ.अमोल कोल्हे यांच्या लग्नाला १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने त्याने पत्नीसाठी स्पेशल पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, १४ वर्षांच्या वनवासाचे फलित काय असते ते माहित नाही, पण १४ वर्षांच्या सहवासाचे फलित नक्कीच चांगले आहे. माणूस म्हणून समृद्ध होणे, संसाराच्या परिघात व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करणे, परस्परपूरक भूमिका घेणे या प्रत्येक गोष्टीत आणखी सुधारणा होत असताना, दोन पाहुणे मात्र आजवर घराबाहेरच ठेवले आहेत ताटकळत. १) ‘तू चूक’ आणि २) ‘मीच बरोबर’. कारण तेवढे केले की सहवासाबरोबरच विरहाच्याही प्रत्येक क्षणाचा सोहळा होतो. समाधानाच्या उंबरठ्याच्या आत सुख नांदतं यावरचा विश्वास दृढ करणाऱ्या सहचारिणीस लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
एक अभिनेता ते यशस्वी राजकारणी हा प्रवास अमोल कोल्हे यांच्यासाठी सोपा नव्हता. पण त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन आज यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशात त्यांच्या इतकाच त्यांच्या पत्नीचा देखील वाटा आहे.
अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या पत्नी अश्विनी या सुद्धा डॉक्टर आहेत. त्यांना आद्या आणि रुद्र ही दोन मुले आहेत. सोशल मीडियावर ते मुलांसोबतचे फोटो शेअर करताना दिसतात.

आद्या ही ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत काम करताना दिसली होती.