Take a fresh look at your lifestyle.

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ईडीच्या फेऱ्यात !

सात तास झाली चौकशी.

मुंबई : महाविकास आघाडीतील उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची इडीकडून तब्बल सात तास चौकशी करण्यात आली. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँक घोटाळा प्रकरणात ही चौकशी केली जात आहे. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक यांच्या लिलावात प्राजक्त तनपुरे यांनी एक साखर कारखाना अतिशय कमी किंमतीत विकत घेतल्याचा आरोप आहे, त्यामुळे ही चौकशी ईडीकडून करण्यात आली आहे.
प्राजक्त तनपुरे यांना ईडीने समन्स बजावला होता. काल ( मंगळवारी) राज्यमंत्री तनपुरे यांना दुपारी एक वाजता हजर राहण्यास सांगितलं होत्रे. पण ईडीच्या मीटिंगमुळे दुपारी तीन वाजता चौकशी सुरू झाली. राज्य सहकारी बँक संदर्भात चौकशी झाली. तनपुरे यांनी ईडीला समाधानकारक उत्तरं दिल्याचे समजते.
ईडीकडून चौकशी झाल्यानंतर बोलताना तनपुरे म्हणाले की, ईडीला सर्व उत्तर दिली आहेत. अजिबात काही गडबड नाही, मी समाधानकारक उत्तर दिली आहेत. प्रमुख प्रश्नांची उत्तरं दिली आहेत, तांत्रिक बाबी शिल्लक आहेत त्याबाबत परत बोलावल्यास पुन्हा चौकशीसाठी हजर होणार आहे. जी आकडेवारी लक्षात नाही त्याबाबतच्या तांत्रिक बाबी आहेत. पुन्हा चौकशीसाठी बोलवल्यास हजर राहणार आहे.
राज्य सरकारमधील 12 पेक्षा जास्त मंत्र्यांच्या मागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला असताना आता आणखी एका मंत्र्याची ईडीने चौकशी केली आहे. त्यामुळे पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. अनिल देशमुख, अनिल परब, एकनाथ खडसे, अर्जुन खोतकर, अशा अनेक नेत्यांमागे सध्या ईडीच्या चौकशीचा फेरा सुरू आहे. त्यात आता प्राजक्त तनपुरेंचीही भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.