Take a fresh look at your lifestyle.

‘पांडू’च्या कलाकारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी !

कोरोना नियमांचा केला भंग.

ठाणे: ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये ‘पांडू’ या मराठी चित्रपटाचा पहिला प्रिमिअर शो पार पडला. यावेळी पांडूच्या कलाकारांनी कोरोना नियमांचा भंग केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या एकतावादीचे नेते भैय्यासाहेब इंदिसे यांनी केली आहे.
कोरोनाच्या नियमांचा भंग करणार्‍या सामान्य नागरिकांकडून पाचशे रुपये दंड आकारण्यात येत आहे. मात्र, सेलिब्रिटींसाठी वेगळा नियम आहे का?, असा सवालही इंदिसे यांनी केला आहे.
भैय्यासाहेब इंदिसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा सवाल केला. तसेच वर्तक नगर पोलिसांना निवेदन देऊन या प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा मागणी केल्याचे इंदिसे यांनी सांगितले. ठाणे शहरातील विवियाना मॉलमध्ये शुक्रवारी पांडू या सिनेमाचा पहिला शो झाला. या वेळी चित्रपटातील कलाकार भाऊ कदम, सोनाली कुलकर्णी, हेमांगी कवी, उदय सबनिस, सविता मालपेकर, प्राजक्ता माळी, कुशल बद्रीके, विजू माने यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी एकाही सेलिब्रेटींने मास्क अथवा सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केले नाही. विशेष म्हणजे, मॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी दोन लस घेणे सक्तीचे असताना एकाच्याही लसीकरणाच्या प्रमाणपत्राची पाहणी करण्यात आली नाही, असा दावा इंदिसे यांनी केला आहे.
▪️तर तिसरी लाट अटळ
या कलावंतांनी दोन्ही लस घेतल्या असतीलही, पण, त्यांनी कोरोनासाठी लागू केलेल्या नियमांचे पालन केलेले नाही. एकीकडे सामान्य नागरिकांनी मास्क न वापरल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, या कलावंतांवर अशी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. अनेकदा कलावंतांचे अनुकरण सामान्य लोक करीत असतात. त्यामुळे येथेही असे अनुकरण झाले तर तिसरी लाट अटळ आहे. त्यामुळे पुढच्यास ठेच, मागचा शहाणा या तत्त्वाने संबधित कलाकारांवर पँडामिक अ‍ॅक्टनुसार गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी इंदिसे यांनी केली आहे. या संदर्भात इंदिसे यांनी वर्तक नगर पोलीस ठाण्यात निवेदनही दिले आहे.