Take a fresh look at your lifestyle.

जसं आहे तसं जगता येणे हाच मोठा परमार्थ !

मनाचं ऐकताना बुद्धी शाबुत ठेवली पाहिजे.

 

मनुष्याला मिळालेली विचार करण्याची शक्ती हेच मुळी मोठं गुढ रहस्य आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत ही शक्ती काम करत रहाते.त्याचा संबंध मेंदुशी जोडला जातो.प्रगल्भ मेंदु वगैरे अशी विशेषने त्याला जोडली जातात.
मेंदु शरीराला आवश्यक असणारी रसायनं पुरविण्याचं काम चोख करतो.त्याला बोगसगिरी चालत नाही. पण मेंदु शरीराचं नियंत्रण ठेवत असला तरी तो प्रधान ठरत नाही. मन,बुद्धी, चित्त आणि अहंकार हे चार कर्मक्रिया करायला भाग पाडणारे अव्यक्त अवयव आहेत.

“बुद्धी” मुख्य भुमिका निभावते.
तशी तुकोबारायांची काही प्रमाणं आपण पाहु..
१)मनाचे संकल्प पावविल सिद्दी।
जरी राहे बुद्धी याचे पायी।।
२)न पाहिजे झाला बुद्धिचा पालट।
केली खटपट जाय वाया।।
३)मन वोळी मना।
बुद्धी बुद्धी क्षण क्षणा।।
४)साधनाची सिध्दी।
मौन करा स्थिर बुद्धी।।
५)गद्ये पद्ये काही न धरावी उपाधी।
स्वाधिन चि बुद्धी करुनी ठेवा।।
अशी कितीतरी प्रमाणं आहेत.
माऊलींनीही बुद्धिची महत्ता हरिपाठात वर्णन केली आहे.
समाधी हरीची सम सुखेविण।
न साधेल जाण द्वैतबुद्धी।।
बुध्दीचे वैभव अन्य नाही दुजे।
एका केशवराजे सकळसिध्दी।।

म्हणजेच बुद्धी शाबुत ठेवण्यासाठी मनशुद्ध ठेवावं लागेल. जसं आहे तसं ज्याला वागता बोलता येईल त्याची बुद्धी अखेरपर्यंत मेंदुकरवी शरीराला चांगली कर्म करायला प्रवृत्त करील.
दाखवायचं एक आणि करायचं एक,सतत कांड्याकिल्ल्या करून समाजाला त्रासवणे,विकृतीनं वागणे,वरुन पहाता फार परोपकारी,साधु,महात्मा, समाजसेवक पण आतुन जर ते नसेल तर मेंदुकरवी नको ती रसायणं शरीराला पोहचवली जातात.मग विकारही अव्यक्त होतात.बाहेरून माणसं धडधाकट दिसतात.पण आतुन पार आजाराने पोखरलेली असतात.

सज्जनहो आपण जसं स्वतःला ठिक वाटेल असंच जगलं वागलं पाहिजे.चांगलं असेल तर समाजाला आवडेलच.पण समाजाला आवडेल म्हणून बेगडी जगण्याची सवय एक दिवस तुम्हाला तुमचं जगणं कठीण करून ठेवील.
प्रयत्न करुया जसं आहे तसं जगण्याचा.आनंद आपोआप येईल. फक्त लक्षात ठेवायला हवं,
गद्य पद्य काही न धरावी उपाधी।
उपाध्या खोटं जगायला भाग पाडतात.उपाध्या खरं आनंदी जीवन जगण्याचा अडसर आहे.
रामकृष्णहरी