Take a fresh look at your lifestyle.

गणेशोत्सव साजरा करताना या गोष्टी आपल्याकडे आहेत का?

नसतील तर गणेशकृपा होणार कशी?

 

हिंदु धर्मात प्रत्येक उत्सव काही तरी शिकवण देणारा आहे. कोणताही उत्सव अर्थहीन नाही. आपण कोणतेही कर्म करताना त्याचा परिणाम काय होणार आहे हे समजुनच ते कर्म केले पाहिजे. गणपती म्हणजे बुद्धीची देवता.मंगलप्रसंगी प्रथम गणेश पुजन,गणेश वंदना आपण आवर्जून करतो त्यामागची भुमिका हातात घेतलेले कार्य सिद्धिस जावे म्हणून सिद्धिविनायक,कार्यात येणाऱ्या विघ्नांचा विनाश करण्यासाठी दोन हात करण्याचं बळ प्राप्त व्हावं म्हणून विघ्नविनाशक,दुःख जाऊन सुख प्राप्त व्हावं म्हणून सुखकर्ता.गणेशाचं स्थान प्रथम देवतेत गणलं जातं.पण कोणतीही इच्छित गोष्ट प्राप्त करण्यासाठी योग्यता असणे अपरिहार्य आहे. म्हणजे विद्यालयीन प्रवेशाशिवाय परीक्षा देता येत नाही अथवा डिग्री मिळवणे अशक्य आहे.

तसं अंधपणाने देवाला भजनं व्यर्थ आहे.माऊली म्हणतात, त्रिवेणी संगमी नाना तिर्थे भ्रमी।चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ।। तिर्थांचं पुण्य लाभण्यासाठी चित्तात नामाची स्थिरता ही पात्रता आहे. ती नसेल तर सारं व्यर्थ आहे असं माऊली म्हणतात.

सज्जनहो सध्या गणेशोत्सव सुरू आहे. घरोघरी गणपती बसवले जातात पण या दहा दिवसांत मिळवायचय काय? याचा विसर पडता कामा नये.निर्बुद्धांची देवता गणेश असुच शकत नाही. गणेश बुद्ध्यांकाचा एक उत्तम आणि अगदी साधा प्रसंग सांगतो.

गणेश आणि बंधु कार्तिकेय यांच्यात श्रेष्ठ कोण?असा विषय एकदा गमतीने शंकर पार्वतीने घेतला.मग काय केलं म्हणजे श्रेष्ठ कोण ठरेल? तर जो पृथ्वीप्रदक्षिणा करुन प्रथम आईवडिलांचं दर्शन करील त्यास श्रेष्ठ समजले जाईल अशी अट ठेवण्यात आली.

कार्तिकेयचं वाहन मोर आणि गणपतीचं वाहन उंदीर आता आपणच अंदाज बांधा जिंकणार कोण?अगदी सरळ आहे,कार्तिकेयच जिंकणार.घंटानाद झाला आणि पृथ्वीप्रदक्षिणेसाठी कार्तिकेयस्वामींनी मोरावर बसुन उड्डाण केले.इकडे परिस्थिती अवघड होती.उंदिर काय पळणार आणि गणपतीचा बोजा तो काय सांभाळणार? गणपती काही क्षणातच बुद्धीवर स्वार झाला आणि पृथ्वीप्रदक्षिणेला पर्याय शोधला.आपल्या मातापित्यांना एक प्रदक्षिणा मारली की एक पृथ्वीप्रदक्षिणेचं पुण्य मिळतं हा शास्राधार शोधला.मग मजेत शंकर पार्वतीला एक प्रदक्षिणा मारली आणि आपलं श्रेष्ठत्व सिद्ध केलं.

आपण गणेशोत्सव साजरा करत असाल तर आनंद आहे पण आपल्या मातापित्यांवरील आपलं प्रेम श्रद्धा गणेशाइतकी बलवान असली तर आणि तरच काही प्राप्त होईल. गणेश देवता माता पित्यांचं जीवनातलं स्थान किती श्रेष्ठ आहे याचा दार्शनिक आहे.आपण या उत्सवातुन मातृपितृ देवोभव एवढं शिकलो तरी खूप काही मिळवल्यासारखं आहे.गणपती बाप्पा मोरया

रामकृष्णहरी