Take a fresh look at your lifestyle.

काय सांगता ? साडे सहा लाख रूपयांचा नारळ !

'या' नारळात असे आहे तरी काय? वाचा! 

 

 

शीर्षक वाचूनच तुम्ही बुचकळ्यात पडला असाल. एका नारळाची किंमत लाखांत कशी असू शकते? पण हे खरे आहे. कर्नाटक जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

सविस्तर असे कि, बगलकोट जिल्ह्यातील जमखंडी येथील चिक्कालकी गावात असणाऱ्या एका मंदिरात नारळाच्या लिलावादरम्यान एक नारळ तब्बल ६.५ लाखांना खरेदी केला गेला. हा नारळ विकत घेणारा व्यक्ती विजयपुरा जिल्ह्यातील टिक्कोटा गावातील एक फळविक्रेता आहे.

श्री बीलिंगेश्वल यात्रेत श्रावण महिन्यातील शेवटच्या दिवशी मंदीर समितीने आयोजित केलेल्या नारळाच्या लिलावात अनेकांनी भाग घेतला. दरम्यान फळ विक्रेत्यानं सर्वात मोठी बोली लावून हा नारळ खरेदी केला. भगवान मलिंगराय म्हणजे शिवाच्या नंदीचं रूप मानलं जातं. या देवाजवळ ठेवलेला नारळ भक्तांसाठी सर्वात खास असल्याने हा नारळ खरेदी करण्याचं भाग्य फळफळतं असा समज आहे.

यंदा बोली एक हजार रुपयांपासून सुरू झाली आणि हा आकडा १ लाखाच्या पार गेला. यानंतर एका भक्तानं तीन लाखाची बोली लावली. ही अंतिम बोली ठरेल असे वाटत असताना फळविक्रेत्यानं दुप्पट रक्कम देत हा नारळ ६.५ लाखांना खरेदी केला.

लिलावातून मिळालेल्या या रकमेचा वापर मंदिराच्या विकासासाठी आणि इतर धार्मिक कामासांसाठी केला जाणारआहे. बोली लावलेल्या महावीर नावाच्या फळविक्रेत्यानं म्हटलं, की लोक मला काहीही म्हणो. मात्र, माझ्यासाठी ही भक्ती आणि विश्वास होता. पुढे महावीर म्हणाले की, हा नारळ घरी ठेवून त्याची रोज पुजाही करणार आहे.