Take a fresh look at your lifestyle.

सुरेखा पुणेकर गुरूवारी मुंबईत उडविणार राष्ट्रवादी प्रवेशाचा बार !

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत होणार प्रवेश.

 

 

मुंबई : लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर 16 सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत. मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यालयात पक्षप्रवेशाचा सोहळा रंगणार असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरेखा पुणेकर पक्षात प्रवेश करणार आहेत.

सुरेखा पुणेकर या राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु होत्या. जुलै महिन्यात त्यांनी स्वतः विधानसभेची निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. अखेर त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.दरम्यान, सुरेखा पुणेकर यांनी आपल्या ठसकेबाज लावणीचे राज्यासह परदेशातही अनेक प्रयोग केले आहेत. त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. मराठी बिग बॉसमध्ये असतानाही त्या चर्चेत होत्या. आता त्या राजकीय क्षेत्रात पदार्पण करत आहेत.

”कार्यक्रमांच्या व्यग्रेतेमुळे त्यावेळी मला राजकीय क्षेत्रात जास्त वेळ देता आला नव्हता. यावेळी मात्र मी पूर्णपणे गांभीर्याने राजकारणाकडे पाहत आहे. गेल्या दोन वर्षात झालेल्या कोवीडच्या कारणाने कलाक्षेत्राची हानी झालेली आहे आणि त्यासाठी फार कुणी राजकीय स्तरावर पाठपुरावा केल्याचे मला अनुभवायला आले नाही. या कलाकारांचे प्रतिनिधीत्व करावे आणि कला क्षेत्राला व त्यातील प्रत्येक कलाकाराला न्याय द्यावा म्हणून राष्ट्रवादीत प्रवेश करीत आहे,” असे पुणेकर म्हणाल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून माझ्या पक्षप्रवेशाला होकार आला असून ठरल्याप्रमाणे माझा पक्षप्रवेश होणार आहे, असे त्यांनी सांगितले.