Take a fresh look at your lifestyle.

शिरूरचा छोटा वस्ताद चमकला रिअॅलिटी शोमध्ये !

चार डिसेंबरपासून पोहोचणार घराघरात.

✒️ सतीश डोंगरे
शिरूर : शिरूर येथील सार्थक विजय शिंदे हा अकरा वर्षाचा छोटा वस्ताद टेलिव्हिजनवरील रिअ‍ॅलिटी शोमध्ये चमकला असून येत्या चार डिसेंबर पासून स्टार प्रवाह वर तो ‘मी होणार सुपरस्टार’ छोटे उस्ताद या कार्यक्रमातून घराघरात पोहोचणार आहे.

https://fb.watch/9FOIEtw0WZ/

शिरूर शहरातील इंदिरानगर येथे त्यांचे घर असून सध्या त्याच्या कीर्तन आणि गाण्यासाठी त्याचे वडील विजय रघुनाथ शिंदे हे त्याच्यासह आळंदीत राहात आहेत. तेथे कलर पेंटिंगची छोटी-मोठी कामे करत आहेत. घरचे कुठलीही संगीताची पार्श्वभूमी नसताना केवळ अंगभूत कला, आवड आणि आवाजाची जादू या बळावर त्याने परिस्थितीतून मार्ग काढत आपल्या गायनाची कला जोपासली आहे.
सार्थकसह या शो मध्ये 5 ते 14 वयोगटातील अनेक छोट्या उस्तादांना झळकण्याची संधी मिळाली आहे. परीक्षकांच्या भूमिकेत अभिनेता सचिन पिळगावकर, गायिका वैशाली सामंत आणि गायक आदर्श शिंदे आहेत. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर 4 डिसेंबरपासून शनिवारी आणि रविवारी रात्री नऊ वाजता हा कार्यक्रम दाखविण्यात येणार आहे.
अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि बालकलाकार अवनी जोशी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. सार्थकने सादर केलेल्या एका अभंगाचा प्रोमो आज आल्यानंतर शिरूर मधील अनेकांनी हा प्रोमो आपल्या मोबाईल स्टेटस वर ठेवला आहे. अभिनेते सचिन यांनी या प्रोमोमध्ये ‘तुमच्या कपाळावर ईश्वराचा हात आहे.’ अशी कॉमेंट एका अभंगावर केल्याचे पाहायला मिळत आहे. सार्थक मुळे शिरूरकरांची छाती अभिमानाने फुलून आली असून सर्वांनाच या शो चे वेध लागले आहेत.
“आमच्या कुटुंबात कुठलीही संगीताची गायनाची परंपरा नाही मात्र लहानपणापासूनच सार्थकला गायनाची आवड असल्यामुळे आम्ही त्याला प्रोत्साहन देत गेलो त्याच्या आवडीने त्याला इथपर्यंत पोचविले.” असे सार्थकचे वडील विजय रघूनाथ शिंदे यांनी ‘पारनेर दर्शन’ शी बोलतांना सांगितले