Take a fresh look at your lifestyle.

धुक्यात हरवली पारनेरकरांची वाट !

सकाळी ९ वाजता थोडा वेळ झाले सूर्यदर्शन.

पारनेर : शहरासह तालुक्यात आज (शुक्रवारी) पहाटे धुक्याची चादर पसरली हाेती. पहाटेपासून धुके दाटले. ते सकाळी साडेसात वाजेपर्यंत कायम हाेते. दाट धुक्यामुळे पुढील व्यक्ती दिसणेही अवघड झाले. त्यामुळे सकाळी आठ वाजेपर्यंत वाहनांना प्रखर दिवे लावण्याची वेळ आली हाेती.

बदलत्या वातावरणामुळे तालुक्यात तीन दिवसांपासून पावसाळी वातावरण आहे. त्यामुळे सूर्यदर्शन वेळेवर हाेत नाही. काल गुरूवारीही दुपारी, सायंकाळी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर शुक्रवारी पहाटे थेट धुक्याची चादर पसरलेली दिसली. सर्वत्र धुके पसरले हाेते. पहाटेपासून धुके दाटून आले. सकाळ झाल्यानंतर धुक्याचे दाटणे आणखी गडद हाेत गेले. थेट ९ वाजण्याच्या सुमारास थोडा वेळ सूर्यदर्शन झाले.

धुक्यामुळे उंच इमारतीही दिसत नव्हत्या. अगदी दाेन फुटांपर्यंतचा रस्ता दिसणेही कठीण झाले हाेते. सकाळी उशीरापर्यंत धुक्याची चादर पसरल्याचे चित्र हाेते. सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांना संपूर्ण शहराने धुक्याची चादर पांघरल्याचे दृश्य निसर्ग पाहावयास मिळाला. शाळेत जाणारे विद्यार्थी तसेच मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांनाही पुढील काही दिसत नव्हते. मात्र, पहाटे सर्वत्र धुके पडले असल्याने रस्त्यावरील व्यक्तीही दिसत नव्हती.

साधारणपणे हिवाळ्यात धुके पडत असते. सकाळी आठ वाजेपर्यंत वाहनधारकांना धुक्यामुळे वाहनाचे दिवे सुरू ठेवूनच वाहने चालवावी लागली. पहाटेच्या वेळेस पडलेल्या धुक्याचे क्षण अनेकांनी आपल्या घराच्या खिडकी, गॅलरी, गच्चीवरून माेबाइलमध्ये टिपले.