Take a fresh look at your lifestyle.

शरीर हे चिंतामणी आहे !

पण देहबुद्धीचा लय व्हायला हवा.

देहबुद्धीने जगणारा आनंदघन स्थितीला जाणुच शकत नाही. कारण देहबुद्धीचा अहंकार हाच सारथी आहे. त्यायोगे कपट,हिंसा करण्याची कर्मे घडतातच.आशा अपेक्षा ही सारी नको ती कर्मे करायला भाग पाडतात.त्यात आपण काही चुकीचं करतोय याचा बोध होत नाही. देहबुद्धीचा तो प्रताप आहे. मात्र हे दुर्गुण त्यागता आले तर शरीर हे चिंतामणी होऊ शकते.
तुकोबाराय म्हणतात,
सकळ चिंतामणी शरीर । जरी जाय अहंकार आशा समूळ ॥
निंदा हिंसा नाहीं कपट देहबुद्धि । निर्मळ स्फटिक जैसा ॥१॥
मोक्षाचें तीर्थ न लगे वाराणसी । येती तयापासीं अवघीं जनें॥
तीर्थांसी तीर्थ जाला तो चि एक । मोक्ष तेणें दर्शनें ॥ध्रु.॥
मन शुद्ध तया काय करिसी माळा । मंडित सकळा भूषणांसी ॥
हरिच्या गुणें गर्जताती सदा । आनंद तया मानसीं ॥२॥
तन मन धन दिलें पुरुषोत्तमा । आशा नाहीं कवणाची ॥
तुका म्हणे तो परिसाहूनि आगळा । काय महिमा वर्णूं त्याची ॥३॥
देहबुद्धीचा व्यवहार थांबला तर अहंकार,आशाअपेक्षा,निंदा,कुटकारस्थाने,कपट, देहबुद्धि नाश पावेल.असे झाले तर मानवी शारीर हे सकल कामनापूर्ति करणारे चिंतामणीच आहे.
वाराणसी हे मोक्षतीर्थ आहे, पण ज्याचे मन आणि शारीर स्फटीकाप्रमाणे शुद्ध होईल तर त्याला या तीर्थाची गरज नाही. तोच तीर्थाचा तीर्थ होतो आणि लोक त्याच्याजवळ येतात.
ज्याचे मन शुद्ध आहे, त्याला तुळशीच्या माळांची गरज नाही, तो हरिभक्तीच्या अभुषणांनी सजलेला असतो, भक्तीच्या आनंदात डूबत असतो.
तुकोबा म्हणतात, त्याने तन, मन, धन विठ्ठल चरणी अर्पण केले आहे,आशा अपेक्षा लय पावल्या आहेत,तो परिसा पेक्षाही श्रेष्ठ आहे.
पण हे आपोआप होणार नाही, त्यासाठी नित्य मनाशी युद्ध करावे लागेल.लहान मुलाला जसे वारंवार पाटीवर अक्षरे गिरवायला भाग पाडावे लागते,तसेच हे आहे. चांगल्या गोष्टी सतत शरीराकडुन करुन घ्याव्या लागतील.मग हे शरीरच कामनापुर्तीचे माध्यम ठरेल.
रामकृष्णहरी