Take a fresh look at your lifestyle.

यूट्यूबवरून ‘त्याने’ मिळविली एटीएम फोडण्याची माहिती अन् पुढे घडले असे काही…

 

 

शिरूर : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पैशांची गरज असल्याने शहरातील एका सधन कुटूंबातील अल्पवयीन मुलाने ड्रिलच्या सहाय्याने थेट एटीएम मशिनच फोडण्याचा प्रयत्न केला. परंतू रात्रीच्या पोलिसांच्या गस्तीत तो पकडला गेला. पालकांसमोर त्याने गुन्ह्याची कबुलीही दिली.

यासंदर्भातील हकीगत अशी की,फिर्यादी पोलिस नाईक प्रताप टेंगले हे त्यांच्यासोबत होमगार्ड सुनिल चोरे यांच्यासह शिरूर शहरामध्ये दि. ११ रोजी अडीच वाजण्याच्या सुमारास रात्रीची गस्त घालत असताना त्यांना शिरुर शहरातील नगर रोडवरील साई कॉम्प्लेक्स मधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये हुडी कॅप व मास्क घालून ड्रील मशीन व हातोडीच्या साहाय्याने एटीएम मशीन फोडून रक्कम चोरण्याचा प्रयत्न करत असतानाचा एक संशयित इसम दिसून आला व तो पोलिसांची चाहूल लागताच पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला तेव्हा पोलीस स्टाफने त्यास पाठलाग करून जागीच पकडले असता तो अल्पवयीन विधीसंघर्षित बालक असल्याचे निदर्शनास आले.

पोलिस पथकाने त्याचे पालकांना बोलवून त्यांच्या समक्ष विचारपूस केली असता त्याने यूट्यूबवरून एटीएम चोरी बाबतची माहिती मिळविली व वडिलांकडून गणपती सजावटीसाठी ड्रील मशीन हवी आहे असे सांगून ती मिळवुन रात्री आईवडील घरात झोपलेले असताना त्यांना काही कळू न देता घराबाहेर पडून एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला असे चौकशीत निष्पन्न झाले.पोलिसांनी ड्रील मशीन, हातोडी इ.जप्त केले असून त्याचेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर प्रकाराबाबत अधिक चौकशी केली असता वरील विधीसंघर्षित बालक हा सधन कुटुंबातील असून त्याचे वडील खाजगी कंपनीमध्ये मॅनेजर पदावर नोकरीस आहेत.व मुलगा शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून आणखी पैसे कमावण्याच्या उद्देशाने त्याने यूट्यूबवरून माहिती घेऊन एटीएम फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला आहे.त्यास बाल न्यायालयात हजर करून पुढील कारवाई शिरूर पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार मांडगे हे करीत आहेत.

सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख,अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते व उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांचे आदेशाने व पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक किरण उंदरे, प्रताप टेंगले,सुनिल चोरे यांनी केलेली आहे.

मी याद्वारे सर्व पालकांना आवाहन करतो की त्यांनी आपल्या मुलांच्या मोबाईल फोनच्या वापराकडे जातीने लक्ष द्यावे.मुले रात्रीच्या वेळी कोठे जातात कोणाच्या संगतीत असतात त्याबाबत दक्षता घेणे व त्यांच्यावर चांगले संस्कार करणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा इंटरनेटच्या माध्यमातून नको ती माहिती मुले मोबाईल फोनवरून घेतात आणि त्याप्रमाणे अशा प्रकारचे कृत्य करतात की जे त्यांना गुन्हेगारी क्षेत्राकडे घेऊन जाउ शकतात.त्याकरिता पालकांनी स्वतःच्या निरीक्षणखाली मुलांना सोशल मिडीयाचा, इंटरनेटचा वापर करू द्यावा जेणेकरुन अल्पवयीन मुले त्यामधून नको त्या आमिषांना बळी पडुन दुष्कृत्य करणार नाहीत.

▪️सुरेशकुमार राऊत

पोलिस निरीक्षक, शिरुर