Take a fresh look at your lifestyle.

नगर जिल्ह्यातील ‘हे’ धरण आज ओव्हरफ्लो होणार !

स्पीलवे मधून सोडणार पाणी !

 

अकोले : उत्तर नगर जिल्ह्यास वरदान समजले जाणारे भंडारदरा धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. आज (रविवारी ) सायंकाळ पर्यन्त धरण काठोकाठ भरण्याची शक्यता आहे.

तीन दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात नवीन पाण्याची आवक सुरू आहे. शुक्रवारी दिवसभराच्या 12 तासात धरणात 236 दलघफु पाण्याची आवक झाली होती तर शनिवारी सायंकाळपर्यंत पाणी साठा 10 हजार 559 दलघफु झाला होता.

धरण 95.65 टक्के भरले असून सध्या सुरू असणारा पावसाचा जोर लक्षात घेता आज ( रविवारी ) भंडारदरा धरण 100 टक्के भरेल असा विश्वास भंडारदऱ्याचे शाखा अभियंता अभिजित देशमुख व्यक्त केला.धरण भरल्या नंतर स्पीलवे मधून ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात येणार आहे.

▪️असे आहे भंडारदऱ्याचे निसर्गसौंदर्य !

भंडारदरा धरणास विल्सन धरण या नावानेही ओळखले जाते. प्रवरा नदीवर आणि जमीन सपाटीपासून 150 मीटर उंचीवर आहे. हे धरण भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर भंडारदरा गावात हे धरण आहे. हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात आहे.विल्सन धरणाच्या जलाशयास आर्थर लेक असे म्हटले जाते आणि प्रवरा नदीच्या पायथ्याशी मिळतो. या तलावाला लेक आर्थर हिल किंवा भंडारादरा लेक म्हणूनही ओळखले जाते.भंडारदरा येथे अनेक नयनरम्य स्थळे आहेत. निसर्गसौंदर्याने नटलेले स्थान असून अनेक धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा हे इथल्या मूळच्या सौंदर्यात अजूनच भर टाकतात.भंडारदरा धरण आणि रंधा धबधबा हे पर्यटकांचे येथील मुख्य आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत.

शेंडी या गावापासून १० किलोमीटर अंतरावर प्रवरा नदीवर रंधा या गावात एक विशाल धबधबा असून तो गावाच्या नावावरूनच रंधा फॉल म्हणून प्रसिद्ध आहे. सध्या हा धबधबा त्यावर असलेल्या जलविद्युत प्रकल्पामुळे फक्त पावसाळ्यातच पहायला मिळतो. पावसाळ्यात हा धबधबा अतिशय रौद्र रूप धारण करतो. पावसाळ्यात मुख्य धबधब्याच्या उजव्या बाजुने अजुन एक धबधबा पहायला मिळतो. दोन्ही धबधबे पुर्ण क्षमतेने वाहत असताना पाहणे हा एक रोमांचित करणारा अनुभव आहे.भंडारदरा बस स्टॉपपासून 10 किमी अंतरावर, पुण्यापासून 156 किमी आणि मुंबईपासून 177 किलोमीटर अंतरावर, रंधा धबधबा हा महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात आहे.

विल्सन डॅमवरच एक मोठा गोलाकार धबधबा असून त्याच्या छत्रीसारख्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे त्याला ‘अम्ब्रेला फॉल’ असे म्हणतात. हा अम्ब्रेला फॉल केवळ जुलै ते ऑक्टोबर महिन्यांतच पहायला मिळतो.भंडारदरा बस स्थानकापासून 500 मीटर अंतरावर, अंब्रेला धबधबा हे अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा (विल्सन) येथे वसलेले एक सुंदर हंगामी धबधबा आहे.