Take a fresh look at your lifestyle.

पुढील दोन दिवसही पावसाचेच !

हवामान खात्याची माहिती.

मुंबई : मुंबईसह राज्यात आज दिवसभर अवकाळी पावसाची रिपरिप सुरुच आहे. दिवसभरात पावसाने अजिबात विश्रांती घेतली नाही. हेच चित्र पुढचे 24 तास असणार आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. हवामान विभागाने राज्यात अलर्ट जारी केला आहे. तसेच मच्छिमारांनाही समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

गेल्या 48 तासात मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये पावसाळी वातावरण झालेलं आहे. याचं कारण म्हणजे दक्षिण पूर्व अरबी समुद्रामध्ये एक सायक्लॉन सर्कुलेशन तयार झाले आहे. त्याचबरोबर एक द्रोणीय भाग कच्छपर्यंत सरकलेला आहे. याचा प्रभाव उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात जास्त असेल. धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघरमध्ये आज 24 तासासाठी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. तर कोकणातील आणि मध्य महाराष्ट्रातील उर्वरीत जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केलेला आहे. तरी मच्छिमारांनी या 24 तासामध्ये सुमद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. नगर जिल्ह्यात पहाटे पासूनच संततधार पावसाला सुरुवात झाली. तसेच सगळीकडे धुके पडले आहेत.राज्यात पालघर, मुंबई नाशिक, धुळे, नंदुरबार, सांगली या भागात मुसळधार तसेच इतर जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात सर्वत्र ढग दाटून आले असून वातावरण फारच थंड झाले आहे. यामुळे अनेकांना ताप आणि सर्दी देखील सुरू झाली आहे.

ऐन हिवाळ्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे राज्यभरात दाणादाण उडाली आहे. नोव्हेंबरमध्ये देखील पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. आता पुन्हा एकदा डिसेंबरच्या सुरुवातीला राज्यात पुन्हा एकदा पावसाच्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
यामुळे शेतकरी चिंतेत आहे,
बंगालच्या उपसागरात देखील कमी दाबाचे क्षेत्र असल्याने आंध्र प्रदेश, तामिळनाडूत पाऊस होतो आहे. अशातच राज्यात देखील अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने पावसाची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून व्यक्त करण्यात आली आहे.