Take a fresh look at your lifestyle.

सुखाचा सदरा जवळच आहे !

ज्ञानाशिवाय तो दिसत नाही.

सुखाच्या शोधात निघालेली माणसं काय करतील भरवसा नाही.कानडीने केला मऱ्हाटा भ्रतार।या तुकोबांच्या अभंगाचे चिंतन आपण या पुर्वी केले आहे. त्या अंतिम चरणात तुकोबाराय जे म्हणतात त्यावर आज थोडं चिंतन करु. कारण सुखाच्या शोधात तुम्ही आम्ही सर्वच निघालो आहोत. थोडं प्राप्त झालं की वाटतं आता भरुन पावलो पण हे काही जास्त काळ टिकत नाही. सुख पहाता जवापाडें।दुःख पर्वताएवढे।। हे अगदी खरं आहे.

तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे येरा येरा जे विछिन्न।तेथे वाढे सीण सुखापोटी।। जसं त्या कानडी स्रीने मराठी नवरा केला आणि दैना झाली. कारण विसंगती कुणाचे कुणाला काही कळेना.महाराज म्हणतात, विसंगत व्यक्तीच्या सहवासात गेलं की सुख तर सोडाच पण मनस्ताप नक्की होणार. आता कानडी बायको कुणी करणार नाही हे जरी खरं असलं तरी जी मिळाली आहे तिला तरी समजून घेता येतय का?किंवा ती तरी समजून घेतेय का? इथुन सुखाच्या शोधाकडे निघावे लागेल.एकत्र राहुनही मनं जुळली नाही की मग विसंगती जशी प्रपंचात दुःख निर्माण करते हे कळते,तसे सुसंगती निर्माण करण्यासाठी मनुष्य झटत नाही.
संतसहवास कशासाठी गरजेचा आहे?ते विसंगतालाही सुसंगत करतात.आहे तसं जुळवून घेण्याची क्षमता संतसहवासाने प्राप्त होते.त्याशिवाय ठेविले अनंते ही अवस्था कळतच नाही. एका व्यक्तीने बोलता बोलता डोळ्यावरचा चष्मा डोक्यावर सरकवला.नंतर त्याला चष्म्याची आवश्यकता भासली.पण चष्मा सापडेना.
घरभर शोधला पण सापडेना.तो बैचेन झाला. त्याची ती बेचैनी पाहुन पत्नीने विचारले,काय शोधताय?तेव्हा तो म्हणाला माझा चष्मा सापडत नाही. तेव्हा ती म्हणाली,आणि डोक्यावर काय आहे?क्षणात बैचैनी संपली.आपलीच असलेली वस्तू आपल्याला मिळाली तरी होणारं सुखं मोठं असतं.सुखाचा सदरा अंगातच आहे.त्याची जाणीव होणं बाकी आहे.
अध्यात्म त्याची जाणीव करुन देते.
रामकृष्णहरी