Take a fresh look at your lifestyle.

प्रा.नंदकुमार नाईक : हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे सोने करणारा परीसच !

प्रदीर्घ सेवेतून झाले निवृत्त.

आमचे प्रेरणास्थान, मार्गदर्शक, आधारस्तंभ, एक समर्पित सेवाव्रती आदरणीय प्रा. नंदकुमार नाईक सर काल प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले… एक संयमी, आदर्श असे व्यक्तिमत्त्व असलेले आदरणीय नाईक सर जनता विद्या मंदिर, कान्हूर पठार महाविद्यालयासाठी नेहमीच प्रेरणास्रोत राहिले.

नाईक सरांच्या पत्नी, त्यांची दोन्ही मुले शुभम आणि अनिकेत,जामगाव येथील सरांचे बालमित्र सुनिल काळे, दत्तात्रय खाडे तसेच प्राचार्य वमने बी.आर.सर,पर्यवेक्षक शिंदे सी.डी.सर तसेच सर्व रयतसेवकांच्या उपस्थितीत काल महाविद्यालयात आदरणीय नाईक सरांचा भावस्पर्शी सेवानिवृत्ती सोहळा संपन्न झाला… “जनता” विद्यालयात गेली 29 वर्षे केमिस्ट्री विषयाच्या आपल्या उत्कृष्ट अध्यापनाद्वारे विद्यार्थ्यांच्या, ‘जनता’च्या हितासाठी मनापासून सेवा देणाऱ्या आदरणीय नाईक सरांचे काल भाषणादरम्यान पाणावलेले डोळे खुप काही सांगून गेले. संवेदनशील मनाचे नाईक सर आपल्या 24 मिनिटांच्या भावुक करणाऱ्या भाषणामद्धे भरभरून बोलत होते.. ऐकणारे आम्ही सर्व देखील भावुक झालो होतो…

कान्हूर पठार येथील 29 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होताना भावनिक होणं साहजिकच आहे.. अध्यापन ह्या आवडीच्या प्रांताची मनसोक्त केलेली मुशाफिरी आता उद्यापासून होणार नाही.. उद्यापासून विद्यालयात आपण नसणार आहोत हा विचार त्यांना सतावत असेल कदाचित..पण नाईक सरांनी कमावलेली सर्वश्रेष्ठ संपत्ती म्हणजे खुप मोठा विद्यार्थी परिवार…! आणि ती त्यांच्यापासून कधीच दूर जाऊ शकत नाही…!
एक आदर्श पुत्र,आदर्श पिता,आदर्श पती,आदर्श शिक्षक अशा विविध वास्तववादी भूमिका जगलेले प्रा. नाईक सर यांच्याविषयी लिहिताना शब्द अपुरे आहेत.

आजपासून नाईक सर कॉलेजमध्ये असणार नाही याची सर्वांनाच आता हुरहुर लागेल ,सरांना देखील काहीतरी चुकल्यासारखं वाटेल, अस्वस्थ वाटेल..खात्री आहे… हाडाच्या शिक्षकाच्या बाबतीत ह्या बाबी होतातच..पण आता सेवानिवृत्तीनंतर सर आता कुटुंबियांना अधिक वेळ देऊ शकतील. रजेचे टेन्शन नसल्यामुळे सुट्टीचा आनंद उपभोगता येईल.त्यांच्या मनात काही योजना असतील तर त्या पुर्ण करण्यासाठी त्यांना वेळ उपलब्ध असेल ,आवड जोपासता येईल…
पुन्हा एकदा नवीन आयुष्याची सुरुवात …त्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा ! आदरणीय नाईक सर,आपणास सेवानिवृत्ती व भावी आयुष्यासाठी सहस्त्रकोटी सहस्त्ररश्मी सदाहरित मोरपंखी शुभेच्छा.
▪️ओमप्रकाश देंडगे