Take a fresh look at your lifestyle.

ढवळपुरी गावाने करून दाखविले ‘रेकॉर्ड ब्रेक’ लसीकरण !

एकाच दिवसात अकराशे नागरिक लसवंत !

 

पारनेर : तालुक्यातील आदिवासी बहूल असणाऱ्या ढवळपुरीमध्ये रेकार्ड ब्रेक लसीकरण झाले आहे. एकाच दिवसात तब्बल अकराशे नागरिकांनी लस घेतली. एकुण 7 हजार लाभार्थ्यांपैकी 3 हजार 400 नागरिक आत्तापर्यंत लस घेऊन संरक्षित झाले आहेत. लसीचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ लागल्याने गैरसमज न बाळगता नागरिकही लस घेण्यासाठी उस्फूर्तपणे पुढे येत आहेत.संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी लसीकरण हे आता कवच कुंडलच ठरणार आहे.

विस्ताराने मोठे असलेले अठरापगड जातीधर्म व बारा वाडयांचे गाव म्हणून ढवळपुरीची ओळख आहे. गावची लोकसंख्याही मोठीच त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करणे हे काम मोठया जिकिरीचे होते. मात्र आरोग्य यंत्रणा, आशा सेविका ग्रामपंचायत, शिक्षण संस्था व स्थानिक स्वयंसेवक युवकांच्या सहभागातून लसीकरणाचे हे काम शक्य झाले. आत्तापर्यंत एकुण पात्र लाभार्थ्यांपैकी सुमारे पन्नास टक्के नागरीकांनी कोणतीही भीती अथवा गैरसमज न बाळगता लसीकरण करुन घेतले.यामध्ये ठाकर,बंजारा,धनगर, मागासवर्गीय समाजाचा समावेश होता.

ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामविकास अधिकारी,कर्मचारी, आरोग्य यंत्रणा, आशासेविका, स्वयंसेवकांनी वाडया वस्त्यांवर जावून लसीकरणाबाबत केलेल्या जनजागृतीमुळेच एकाच दिवसात अकराशे नागरीकांनी लसीकरणाचा लाभ घेत रेकॉर्ड ब्रेक केले. सुमारे सहा लॅपटॉपद्वारे हे काम सुरू होते.दुर्गादेवी विद्यालयाचेही या कामी सहकार्य लाभले.लसीकरणाची ही मोहीम राबवण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश लाळगे , प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ. मानसी मानुरकर यांचे विशेष सहकार्य लाभले.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका पाहता आरोग्य विभागाला कोविशिल्डचा लस साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत आहे. त्यामुळेच लसीकरणाचा वेगही वाढत आहे.ढवळपुरीसारख्या आदिवासी बहूल गावात एकाच दिवसी अकराशे नागरीकांचे झालेले लसीकरण ही समाधानकारक बाब आहे. उर्वरीत नागरिकांनी मनात भिती न ठेवता लसीकरणासाठी पुढे यावे.

        डॉ.राजेश भनगडे

         सरपंच,ढवळपुरी