Take a fresh look at your lifestyle.

“त्या” डान्सबाबत खा.सुप्रिया सुळे म्हणाल्या की…

 

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मुलीचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. अत्यंत थाटामाटात पार पडलेल्या या विवाहसोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांपासून ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे अशा अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली. दरम्यान लग्नाआधी पार पडलेल्या संगीत कार्यक्रमातील संजय राऊत आणि खासदार सुप्रिया सुळेंच्या डान्सचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. संगीत कार्यक्रमात खा.सुप्रिया सुळे आणि खा.संजय राऊत यांनी केलेल्या डान्सची चांगलीच चर्चा रंगली होती. दरम्यान यावरुन काहींनी टीकादेखील केली होती. या टीकेला सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं आहे.
सुप्रिया सुळे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, “तो एक कौटुंबिक कार्यक्रम होता, बाहेरचं कुणीच नव्हतं. एखाद्या खासगी कार्यक्रमात आम्ही काय करतो त्यावर पण जर कुणाला टीका करायची असेल तर त्यावर काय बोलणार?”. ते आमच्या घरातल्या मुलीचं लग्न होतं असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
खा.संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊतचा सोमवारी २९ नोव्हेंबरला विवाहसोहळा पार पडला.ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशीचा विवाह झाला. लग्नाआधी आयोजित संगीत कार्यक्रमात सर्वच उपस्थितांनी ठेका धरला. रेनेसाँ या सप्ततारांकित हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे कुटुंबही हजर होते. यावेळी खा.संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी केलेल्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
▪️विखे पाटलांनी केली होती टीका !
भाजपा नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी यावरुन महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती. विखे पाटील म्हणाले होते की,, “एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत, शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि तुम्ही काय करता तर लग्नात नाचता. लग्नात तुम्ही नृत्य करता. एकीकडे लोक आत्महत्या करत आहेत. दुसरीकडे वीज कनेक्शन तोडले जात आहेत. गावची गावे अंधारात आहेत. जनाची नाही तर मनाची तरी ठेवा, हीच महाविकास आघाडीची कर्तबगारी आहे का?”