Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रवादीचे ‘हे’ मंत्री वादग्रस्त विधानामुळे पुन्हा अडचणीत !

मुंबई : अनेकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असलेले राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. शिवाय त्यांच्या या वक्तव्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. राज्यात गुटख्यावर बंदी असताना डोकं शांत ठेवण्यासाठी गुटखा पानसुपारी खाण्याचा सल्ला आव्हाडांनी दिला आहे.
भिवंडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन जितेंद्र आव्डाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी डोके शांत ठेवायचे असेल तर रजनीगंधा पानसुपारी खा, असा अजब सल्ला दिला. आव्हाडांच्या वक्तव्यानंतर कार्यक्रमात सर्वांना हसू आवरले नाही. हे वक्तव्य करुन आव्हाडांनी विरोधकांना टीका करण्यासाठी ऐती संधी दिली, त्यामुळे आता त्यांच्यावर विरोधकांकडून टीकेची झोड उठण्याची शक्यता आहे.
▪️मंत्री जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले होते?
शुक्रवारी भिवंडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना आव्हाड म्हणाले की, मी मुस्लीम बांधवांना विनंती करतो की, त्यांनी शांत राहावं, डोकं गरम करून घेऊ नये. विरोधक राजकीय स्वार्थासाठी तुमची डोकी भडकवत आहेत. पण तुम्ही शांत रहा, डोकं थंड ठेवण्यासाठी मांस कमी खा आणि तोंडात रजनीगंधा, गुटखा ठेवा, मात्र शांत रहा, असे वादग्रस्त वक्तव्य आव्हाडांनी केले आहे.
▪️दरवाढीवरुन भाजपावर टीका
यावेळी आव्हाडांनी देशातील महागाई आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरवाढीवरुन भाजपावर निशाणा साधला. देशात महागाई उच्चस्थरावर आहे, पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत. भाजपाची सत्ता आल्यास देशातील प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 15 लाख जमा होतील, अशी घोषणा मोदींनी केली होती. मग आता त्या घोषणेचे काय झाले, असा सवाल उपस्थित करत त्यांनी भाजपावर निशाणा साधला.