Take a fresh look at your lifestyle.

सुखी आयुष्य जगण्याची ‘ही’ पंचसूत्री आहे !

ती भिंतीवर आरशाशेजारीच चिकटवून ठेवली पाहिजे.

 

 

कुणाला सुखी जगावसं वाटत नाही?सर्वांनाच सुख हवं आहे. पण प्रत्यक्षात त्याची अनुभूती फारच दुर्मिळ आहे. सुखी जगण्याचा सर्वच प्रयत्न करतात.पण त्यासाठी लागणारं तंत्र मात्र जाणत नाही. समर्थांनी म्हटलं,जगी सर्व सुखी असा कोण आहे।विचारी मना तुचि शोधुनी पाहे।।

म्हणजे आपणच आपल्या मनाला हा प्रश्न विचारायचा आहे की या जगामधे सर्व सुखांना प्राप्त करुन घेऊ शकलेला कुणी आहे का?

आपण ज्याला विचाराल तो कमी कशाची आहे याचा पाढाच वाचेल.आपण आपल्या परिचित कुणी भेटलं की सहज विचारतो,कसं काय चाललय?समोरचा हमखास म्हणतो,अगदी मजेत चाललय.पण हे बहुतांश अजिबात खरं नसतं.आपली ती इच्छा नसते की आपलं दुःख समोरच्याला कळावं.मग तुम्ही म्हणालं या जगात सर्व सुखी मनुष्य कुणी नाहीच का?

कितीतरी माणसं या जगात सर्वसुखी आहेत.पण ती त्याची जाहिरात करत नाहीत ही खरी मेख आहे.पंचसूत्री हे त्या मागचं राज आहे.सुखी जगण्याची पंचसूत्री प्रत्येकाला पाठ असायला हवी.म्हणजे गैरकृत्य करताना त्याचं स्मरण व्हाव यासाठी तरी ते मुखोद्गत असायला हवं.

पहिलं सुत्रः स्वतःवर प्रेम करता आलं पाहिजे.आपण अनेकदा अपयशानं घेरलो की मग मी करंटा,कमनशिबी,अपयशी म्हणून स्वतःलाच दोष देत रहातो.स्वतःच स्वतःचा अपमान करणारा स्वतःवर प्रेम कसं करु शकेल?स्वतःशी प्रामाणिक कसा वागु शकेल? म्हणून स्वतःवर प्रेम करायला शिकलं पाहिजे मग चुकीचे संस्कार शरीर स्विकारणारच नाही.

दुसरं सुत्रः आमचं कर्म इतकं शुद्ध असलं पाहिजे की त्यात लपवाछपवी करण्याची वेळ यायला नको.दिवसभरात जी कर्म घडतील त्याचा पश्चाताप होता कामा नये.उलट त्या कामाचा झोपताना आठव झाला की अभिमानानं उर भरुन यायला हवा.

तिसरं सुत्रः स्वप्नातही दुसऱ्याचं वाईट चिंतन नको.अगदी आपल्या विषयी वाईट वागणाराचं सुद्धा भलं होवो,त्याला सदबुद्धी प्राप्त व्हावी अशीच मनोकामना केली पाहिजे.हे उचलली जीभ आणि लावली टाळुला असं समजु नये मी स्वतः हे प्रयोग करीत आहे आणि त्यात यश आणि प्रचंड समाधान मिळत आहे.कठीण आहे पण अशक्य नाही. शास्र जाणल्यास हे बळ लवकर प्राप्त होते हा माझा अनुभव आहे.

चौथं सुत्रः नेहमी सकारात्मक रहाता आलं पाहिजे. नकारात्मक भाव निर्माण होण्यामागे जन्माला आल्यापासून आमच्यावर झालेल्या कुसंस्काराचं ते फळ आहे पण असं जरी असलं तरी बदल करणं शक्य आहे.संग सत्पुरुषांचा मिळाला तर ही क्रिया वेगाने घडते.

पाचवं सुत्रः हे बोलायला ऐकायला सोपं आहे पण आमलात आणणं तितकच कठीण.कोणतं आहे हे शेवटचं सुत्र?’क्षमादान’ त्याचं नाव.क्षमा मागणं आणि क्षमा करणं या क्षमादानाच्या दोन बाजु आहेत.क्षमा करण्याणी क्षमता वरपांगी विचार करणाराला अनेक जन्मी प्राप्त होत नाही. आध्यात्मिक जीवनशैली हे सगळं देण्यास समर्थ आहे.

सज्जनहो मी या वाटेवरचा पांथस्थ आहे. शिकतो आहे. थोडं जरी जमलं तरी आनंद आभाळभर आहे.

रामकृष्णहरी