Take a fresh look at your lifestyle.

जीवाने परम सत्य जाणलं पाहिजे !

मृत्यू आणि काळ यांचं नातं कळायला हवं.

 

 

 

परम म्हणजे श्रेष्ठ,अंतिम.त्यापुढे सगळी सत्य लहान ठरतील. मग असं परमसत्य कोणतं आहे?
त्या सत्याचं नाव आहे,’मृत्यू’
मृत्यू हे परम सत्य आहे.
हे जाणने म्हणजे ‘काळ’
नावाच्या स्थितीला ओळखणे
तुकोबाराय म्हणतात,
आयुष्य खातो काळ सावधान
काळाच्या तडाख्यातुन ना पापी वाचणार आहे ,ना पुण्यवान.त्याला काळ खाणारच.
काळाची एक खासियत आहे.तो कोणत्यावेळी मृत्यू घेऊन येईल, हे आजपर्यंत कुणीही सांगु शकला नाही.
मग काळाचा प्रताप जाणनं म्हणजे त्याला शरण जाणे होय.शरण जाणे म्हणजे, कोणत्याही क्षणी तु माझी इहलोकीची यात्रा संपवु शकतोस हे मी जाणले आहे.म्हणजे परमसत्य जाणले आहे,म्हणून मी आता प्रत्येक दिवस माझा अखेरचा आहे,असे समजून जगणार आहे.
मग आता विचार करा.नुसता मृत्यू येणार म्हटलं की अवसान गळून पडतं.नको नको मला जगायचं आहे.अशी विनवणी मनुष्य अकांताने करत रहातो.पण….पण….
देह हे काळाचे।
धन कुबेराचे।
तेथे मनुष्याचे काय आहे?।। मग जगावं कसं?
असं जगावं त्या अखेरच्या क्षणी म्हणजे परम सत्याला सामोरे जाताना,जगुन तृप्त झाल्याचा भाव निर्माण व्हायला हवा.आणि तो होण्यासाठी काहीतरी खास करायला हवं.
‘मृत्यू’येणारच पण मृत्यूनंतरचंही जीवन आहे हे मानायला जगासाठी काहीतरी करावं लागेल. झिजावं लागेल, तेही विनास्वार्थ.म्हणून ‘परमसत्य”जाणा.काळ हाच ईश्वर आहे.श्रीमद्भागवताच्या प्रारंभीच सत्यं परम धीमही असं अधोरेखित केलं आहे.म्हणजे जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर हेच ते सत्य आहे. चराचर नष्ट झाल्यावरही जे शिल्लक रहातं ते ईश्वर तत्व.काळ रुपानही त्याचीच साक्ष आहे.आणि त्यामुळे देहरुपाचं अस्तित्व नष्ट झालं की व्यक्त होण्याची साधनं समाप्त होतात.म्हणून लौकिकार्थाने मृत्यू हेच अंतिम सत्य आहे.
‘जीवन’किती अनमोल आहे,हे कळेल तर प्रत्येक क्षण कारणी जाईल.कुणासाठी काहीतरी करता आलच पाहिजे. माझ्या जगण्याने कुणालातरी फरक पडलाच पाहिजे. पण फरक हा आनंद देणारा हवा.माझं अस्तित्व आनंददायी असावं जगासाठी. कुणीतरी प्रार्थना करावी,माझ्या जगण्यासाठी. दुसऱ्याच्या जगण्याला सहाय्यभूत होता आलं की हे सारं आपोआप होतं.
हे परमसत्य जाणण्यासाठी
सद्गुरुंना शरण जावं लागेल.
सद्गुरू कोणत्याही कर्मकांडाशिवाय आपल्याला त्या ब्रम्हतत्वाची ओळख करून देतात.कर्मकांडात अडकलेला मनुष्य आत्मकल्याणापर्यंत जात नाही.मला या गोष्टीचा अभिमान आहे.मला सद्गुरू लाभले.त्यांनी जगद्कल्याणाचा मंत्र दिला,
‘नरसेवा नारायण पुजा’
मनुष्य सेवेतच ईश्वराची पुजा घडते.मला मनोमन पटलं ‘फिनिक्स’ जन्माला यायचं कारण माझे गुरूदेवच आहेत. आणि म्हणूनच तुमच्यासारख्या देवमाणसांच्या सानिध्यात यायला मिळालं,म्हणूनच हा आनंदाचा क्षण.
चला काहीतरी खास करु.
कारण मनुष्यजन्म मिळाला हेच खास आहे.त्याला अधिक खास करू रंजल्या गांजलेल्यांची सेवा करुन,समाजासाठी कल्याणकारी कर्म करुन त्या सत्याला सामोरं जाऊ.कदाचित तो क्षण आनंदाने भोगण्याचं बळ आपल्याला प्राप्त होईल.
रामकृष्णहरी