Take a fresh look at your lifestyle.

भाजपाचे ज्येष्ठ नेते शामराव चकोर यांचे निधन.

समाजकारणातील आदर्श व्यक्तिमत्व गमावले.

 

शिरूर : शिरूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शामराव चकोर ( वय 69) यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने भाजपच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
चकोर हे भाजपाचे तालुक्यातील सर्वात जुने कार्यकर्ते होते. “आप्पा” नावाने ते जिल्ह्यात परिचित होते. तालुक्यातील मांडवगण फराटा हे त्यांचे मूळ गांव. समाजकारणातील एक आदर्श व्यक्तिमत्व, तत्ववादी, निष्ठावंत नेते म्हणून जिल्ह्यात त्यांची ओळख होती.
न्हावरे येथील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले होते. सध्या ते दिल्लीच्या राष्ट्रीय अनुसंधान परिषदचे सदस्य म्हणून कार्यरत होते. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या वर्तुळात त्यांची ऊठबस होती. शिरूरच्या विधानसभेच्या प्रत्येक निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचा त्यांनी नेटाने प्रचार केला होता. राज्य पातळीवरील अनेक वरिष्ठ नेत्यांच्या सभांच्या नियोजनाची जबाबदारी चकोर यांच्यावर असायची.
राजकारणातील एक सुसंस्कृत नेते म्हणून विरोधकांमध्ये ही त्यांच्याबद्दल आदराची भावना होती. भारतीय जनता पार्टीचा एक चांगला मोहरा आम्ही गमावला. ते माझे जिवाभावाचे मित्र होते. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी मला साथ दिली. त्यांच्या जाण्याने पक्षाचे भरून न येणारे नुकसान झाले आहे. माझ्यावतीने त्यांना अखेरची श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दांत शिरूर – हवेलीचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.