पारनेर : आगामी काळात होणाऱ्या नगरपंचायतीसह सर्वच निवडणुका भाजपच्या कमळ या चिन्हावर लढविल्या जाव्यात अशी भूमिका सर्व कार्यकर्त्यांनी घेतल्याची माहिती भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी दिली.
पारनेर येथील सेनापती बापट स्मारकामध्ये तालुका भाजपाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये आगामी काळात येणाऱ्या नगरपंचायत, पंचायत समिती,जिल्हा परिषद, बाजार समिती या निवडणुकांबाबत चर्चा करण्यात आली.वरिष्ठांशी यासंदर्भात चर्चा करून आगामी काळामध्ये येणाऱ्या निवडणुकांमध्ये सर्व कार्यकर्त्यांना न्याय देण्यात येईल,त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांच्या सर्व निवडणुका संघटनेच्या जोरावर जिंकण्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती तयारी आगामी काळात करण्यात येईल असेही श्री. कोरडे यांनी सांगितले.
तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील ,पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉ. सुजय विखे पाटील ,प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे या सर्वांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील भाजप संघटना जोरदार बांधणी करून सर्व निवडणुका जिंकण्याचा दृष्टिकोनातून प्रयत्न करणार असल्याचे श्री. कोरडे म्हणाले.
या बैठकीत कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या भावना जिल्हा कोअर कमिटी पुढे मांडून त्यांना पूर्णपणे पाठबळ देऊ,नवे-जुने असा भेदभाव न करता या एकत्रित निवडणुका भाजपाच्यावतीने पूरक भूमिका घेणार असल्याचेही जिल्हा सरचिटणीस श्री दिलीप भालसिंग यांनी यावेळी सांगितले.