Take a fresh look at your lifestyle.

सभापती प्रशांत गायकवाड यांच्या शेतकऱ्यांप्रती असणाऱ्या आस्थेची राज्यभरात चर्चा !

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे कौतुकास्पद उद्गार.

 

पारनेर : महाराष्ट्र शासनाने ‘ ई पीक पाहणी नोंदणी ‘ हे सुरू केलेले ॲप हे शेतकऱ्यांसाठी नव्या युगाची सुरुवात असून या क्रांतिकारी निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होऊन यापुढे शेतकरी खऱ्या अर्थाने सक्षम होणार आहेत असे सांगतानाच सभापती प्रशांत गायकवाड यांच्या शेतकऱ्यांप्रती असलेल्या आस्थेचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कौतुक केले.

कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर व वाळुंज फार्मर प्रोड्यूसर कंपनी वाळूंज यांचे संयुक्त विद्यमाने दि. 11 सप्टेंबर रोजी ‘ ई पीक पाहणी नोंदणी ‘ कशी करावयाची याविषयी ऑनलाइन झूम मीटिंग द्वारे मार्गदर्शनाचे आयोजन बाजार समिती पारनेर येथे केले होते . या ऑनलाईन ई पीक पाहणी नोंदणी चर्चासत्रात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सहभाग घेतला होता.

यापुढेही शासनामार्फत दोन ऑक्टोबरपासून मोफत सातबारा, ऑनलाइन फेरफार देण्यात येणार आहे. हा उपक्रम महाराष्ट्र राज्यासह देशभर सुरू होण्याची आवश्यकता असून त्या माध्यमातून पीकनिहाय माहिती तंतोतंत संकलित करता येणार आहे व त्याचा भविष्यात बाजार भाव व पिकाचे नियोजन यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे असे ना.थोरात यांनी सांगितले व बाजार समितीच्या ई पीक पाहणी नोंदणी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

यावेळी सभापती गायकवाड यांनी सांगितले , यापुढे इ पीक पाहणी नोंदणी ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे ,यापुढे शासनाचे आधारभूत किमतीने शेतमाल खरेदी, सर्वप्रकारची शेतकरी अनुदान , क्षेत्रवाढ ,विमा नुकसान भरपाई , शासकीय मदत या योजना या माध्यमातून मिळणार आहेत . सध्या खरीप हंगामातील मूग ,उडीद ही पिके काढणी होऊन गेलेली आहेत व त्यामुळे त्यांची नोंद करणे शेतकऱ्यांना शक्‍य होणार नाही त्यासाठी शेतकऱ्यांना पर्याय उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी श्री गायकवाड यांनी यावेळी केली.

ई पीक पाहणी नोंदणी ॲप निर्मितीसाठी राज्याचे समन्वयक श्री रामदास जगताप यांनी या चर्चासत्रात सहभागी होऊन शासनाचे पिकेल ते विकेल ही जी संकल्पना आहे ती खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात येणार आहे असे सांगितले. काढणी झालेल्या पिकांची नोंदणी या हंगामा पुरती तलाठी स्तरावरून करण्यात येईल असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

शासनाने हे ॲप उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ,आ.निलेश लंके ,जिल्हा बँकेचे चेअरमन उदय शेळके व महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी यांचे सभापती गायकवाड यांनी आभार मानले. या चर्चासत्रात प्रांताधिकारी श्री सुधाकर भोसले , शेतकरी यांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. श्री एस. यु .मांडगे ( तलाठी )व शुभम काळे कृषी सहाय्यक यांनी या चर्चासत्रात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांची शेतकऱ्यांविषयी असणारी आस्था व पारनेर बाजार समितीच्या कामकाजाची राज्यभर चर्चा होत असून सभापतींच्या कामाचे महसूल मंत्री ना .बाळासाहेब थोरात यांनी कौतुक केले.