Take a fresh look at your lifestyle.

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात ऐतिहासिक वाढ !

राज्य सरकारचा मोठा निर्णय.

 

मुंबई : गेल्या १५ दिवसांपासून विलिनीकरणाच्या प्रमुख मागणीसाठी सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने बुधवारी मोठा निर्णय घेत एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ केली आहे. ही पगारवाढ एसटीच्या इतिहासातील सर्वात मोठी पगारवाढ ठरणार आहे.
राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, ज्या कर्मचाऱ्यांनी १० वर्षं सेवा दिली आहे अशा एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ठोक ५ हजार रुपयांची पगारवाढ करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांचा सध्याचा पगार सुमारे १२ हजार इतका असून तो आता पगारवाढीनंतर १७ हजारांवर पोहोचणार आहे. त्यांच्या पगारात एकूण ७ हजार २०० रुपये इतकी वाढ करण्यात आल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी जाहीर केले आहे. ही पगारवाढ नोव्हेंबर महिन्यापासून मिळणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे.
सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, ज्या कर्मचाऱ्यांनी आपली सेवा १ ते १० वर्षे अशी पूर्ण केली आहे अशा कर्मचाऱ्यांच्या मूळ १२ हजार ८० इतक्या वेतनात वाढ होऊन त्यांचे वेतन आता १७ हजार ३९५ रुपये इतके होत आहे. याचाच अर्थ ज्याचे एकूण वेतन १७ हजार ८० इतकं होतं ते आता २४ हजार ५९४ इतके होत आहे. यात एकूण ७ हजार २०० रुपये इतके वाढले असून ही पगारवाढ ४१ टक्के इतकी करण्यात आली आहे.
त्याच प्रमाणे ज्या एसटी कर्मचाऱ्यांची सेवा १० ते २० वर्षे इतकी झाली आहे, अशा एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात ४ हजारांनी वाढ करण्यात आली आहे. ज्या कर्मचाऱ्यांचा पगार १६ हजार इतका होता, त्यांचा पगार आता २३ हजार ४० इतका झाला आहे. म्हणजेच त्यांचा एकूण पगार आता २८ हजार ८०० रुपये इतका झाला आहे.
तसेच, ज्या कर्मचाऱ्यांची सेवा २० वर्षांहून अधिक झालेली आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात २ हजार ५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यात ज्यांचे मूळ वेतन २६ हजार रुपये इतके होते किंवा ज्यांचे वेतन ३७ हजार ४४० रुपये होते त्यांचा पगार आता ४१ हजार ४० रुपये इतका झाला आहे. ज्यांचे मूळ वेतन हे ३७ हजार किंवा स्थुल वेतन ५३ हजार २८० रुपये इतके होते, त्यांचे मूळ वेतन ३९ हजार ५०० इतके, तर त्यांचे सुधारित वेतन ५६ हजार ८८० रुपये इतके झाले आहे.