Take a fresh look at your lifestyle.

मनोहरमामा भोसलेला मिळाली ‘इतक्या’ दिवसांची पोलिस कोठडी !

अडचणींत आणखी वाढ होणार ?

 

बारामती : संत श्री बाळूमामांचा अवतार असल्याचे सांगत बारामतीतील युवकाची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. या गुन्ह्यातील आरोपी मनोहर भोसले याला पोलिसांनी काल सातारा जिल्ह्यात ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयाने आज पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

फसवणूक प्रकरणी मनोहर उर्फ मामा भोसले (वय 39, रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) याला शुक्रवारी (दि. 10) सातारा जिल्ह्यातील लोणंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सालपे येथील एका फार्म हाऊसवरून पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मनोहर भोसलेला ताब्यात घेतले होते. दरम्यान, भोसले याला 16 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने आज दिले आहेत.

त्याला सायंकाळी उशीरा बारामती तालुका पोलिस ठाण्यात आणण्यात आले. आज (शनिवार) सुट्टीच्या न्यायाधीशांपुढे त्याला हजर करण्यात आले असता न्यायाधीश ए.जे.गिऱ्हे यांनी त्याला पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.आरोपीच्या वतीने विजयसिंह ठोंबरे यांनी युक्तिवाद केला तर पोलिसांच्या वतीने महेश ढवण यांनी बाजू मांडली.

बारामतीतील शशिकांत सुभाष खऱात याच्या वडिलांच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मनोहर भोसले याने बाळूमामांचा अवतार असल्याचा बनाव केला. फिर्यादीच्या वडिलांच्या गळ्यातील थायरॉईड कर्करोग बरा करतो असे सांगितले. बाभळीचा पाला, साखर, भंडारा खाण्यास दिला.

भोसले याच्या अन्य दोन साथीदारांना अद्याप अटक करायची आहे, गुन्ह्यात घेतलेली रक्कम व वापरलेले वाहन जप्त करायचे आहे.

यासह अन्य बाबींवर तपास करणे बाकी असल्याने पोलिस कोठडीची मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आली.

मनोहरमामा भोसले हे उच्चभ्रू राहणीमानाने प्रसिद्ध आहेत. पांढरा शुभ्र पोशाख, डोक्यावर तलम फेटा, अन् खांद्यावर छोटीसी घोंगडी असा त्यांचा नेहमीचा पेहराव पण आज न्यायालयात येताना भोसले हा टी शर्ट – नाईट पॅन्ट घालून आल्याने अनेकांना ओळखलाच नाही.