Take a fresh look at your lifestyle.

आ.निलेश लंकेंना शिरुरकरांनी ‘या’साठी घातले साकडे !

आमदारांनी घातले तातडीने लक्ष.

शिरूर : सध्या रांजणगाव – कारेगाव पर्यंत असलेली पीएमपीएमएल बस सेवा शिरूर पर्यंत सुरु करावी अशी प्रवाशांची अनेक दिवसांची मागणी असूनही प्रशासनाकडून या मागणीची दखल घेतली जात नसल्यामुळे प्रवाशांनी आता पारनेरचे आमदार निलेश लंके यांना साकडे घातले आहे.
दुसऱ्या टप्प्यात पीएमपीएमएलने अनेक नवीन मार्गावर बससेवा सुरू केली मात्र त्यामध्ये शिरूरचा समावेश न केल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी ही वारंवार पत्रव्यवहार करूनही त्याची दखल घेतली गेलेली नाही. याशिवाय शिरूर प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अनिल बांडे यांच्यासह शिरूरच्या मनसे पदाधिकाऱ्यांनी हा विषय लावून धरलेला आहे. मात्र अद्यापपर्यंत याबाबत कोणताच निर्णय झालेला नाही त्यामुळे प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय होत असून आता शिरूर शहरातील नागरिकांनी चक्क पारनेरचे आमदार निलेश लंके यांनाच साकडे घातले आहे.
आमदार निलेश लंके यांनीही नागरिकांची ही मागणी गांभीर्याने घेतली असून पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांना याबाबत पत्र पाठवले आहे. त्यामुळे आता ही बस सेवा कधी चालू होणार याकडे प्रवासी डोळे लावून बसले आहेत. शिरूर येथून रांजणगाव एमआयडीसी या ठिकाणी येणारा मोठा कामगार वर्ग असून त्यामध्ये महिला कामगारांची समावेश आहे मात्र याठिकाणी ये-जा करण्यासाठी सक्षम आणि सुरक्षित अशी वाहतूक व्यवस्था नसल्याने तसेच खाजगी गाड्या मोठ्या प्रमाणात प्रवासी भाडे आकारत असल्यामुळे प्रवाशांची कोंडी होत आहे. याशिवाय आता कोरोनाचे संकट दिवसेंदिवस कमी होत असून शाळा-महाविद्यालये ही सुरू होणार आहेत आहेत, त्यामुळे ही बससेवा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार आहे.
सध्या एसटीचा संप सुरू असून त्यामुळे शिरूर शहरातील नागरिक खाजगी वाहनातून प्रवास करून कारेगाव येथे येतात व बसने पुण्याला जातात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिरूरपर्यंत बससेवा सुरू करण्यासाठी सकारात्मक असून मात्र काही तांत्रिक अडचणी असून त्यामुळे विलंब होत आहे. मात्र लवकरच ही बससेवा शिरूर पर्यंत सुरू होईल, असे समजते.