Take a fresh look at your lifestyle.

शरीराला भोगात बुडवावं की त्यागात सुकवावं !

दोहोंचा मध्य कसा साधालं ?

मनुष्य परिस्थितीनुसार शरीराचे लाड करीत असतो.गरीबीत हातगाडीवर जाऊन वडापाव खाईल तर श्रीमंतीत पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन काट्या चमच्याने जेवणाचा आस्वाद घेईल.विकार सुद्धा परिस्थिती नुसार माणूस सांभाळीत असतो.तशा सोई समाजात उपलब्ध असतातच.
खुपटात जाऊन गांजा ओढणारा आणि रेव्हपार्टी करणाऱ्याची पात्रता एकच ती म्हणजे माणुस. तुम्ही हे शरीर कसं संपवणार यावर जीवन अवलंबून आहे.

संत एकनाथ महाराज म्हणतात,
नरदेहा ऐसे गोमटे ।शोधिता त्रिलोकी न भेटे ।।आणि देहाऐसे गोमटे ।अत्यंत खोटे आण नाही ।।हे भोगवे ना त्यागवे ।मध्यमभाग विभागावे ।।भगवतमार्गी लावावे ।तरीच पावावे परमार्थसुख ।।
नरदेह हा तिन लोकात श्रेष्ठ आहे. त्याहुन सुंदर दुसरं काहीच नाही पण त्या इतकं खाटंही दुसरं काही नाही.त्याला फार भोग किंवा त्याग देऊच नये.भोगाचा आणि त्यागाचा मध्य साधता आला पाहिजे. त्यासाठी भगवत चिंतन हाच राजमार्ग आहे.पण हे इतकं सहज पटणारं नाही.पण हे मात्र लक्षात ठेवलं पाहिजे की भोगात बुडवुन घेणारे जसे लवकर संपतात तसेच त्यागाचा अतिरेकही देह संपवणाराच आहे.
नाथ बाबा म्हणतात, याला फार भोगही देऊ नये आणि फार त्यागही देऊ नये.मध्य साधता आला पाहिजे. हिंदुधर्म शास्र श्रेष्ठ याचसाठी आहे. अन्नाचा त्याग करुन मरण्याची गरज नाही. पण अधुनमधून उपवास करावा हे आम्हाला शास्र शिकवतं.प्रपंचाचा त्याग करण्याची गरज नाही.परमार्थाची जोड त्यात असावी म्हणजे सन्यास घेण्याची वेळ येणार नाही.सहज जीवन जगणं शक्य आहे.कोणत्याही गोष्टीचं अवडंबर करण्याची गरज नाही. मिथ्या अभिमान जन्माला घालुच नये.
शरीराच्या आरोग्यासाठी ते घातक आहे.मिळालेलं आयुष्य आनंदमयी जगण्याची प्रेरणा आध्यात्म देते.आपण इतकच करायचय, परमार्थाला प्रपंचात आणायच.मग जगण्याचा सुवर्णमध्य आपोआप साधला जाईल.
रामकृष्णहरी