Take a fresh look at your lifestyle.

संत परंपरेच्या मार्गावरच महाविकास आघाडी सरकारची वाटचाल !

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पिंपळनेर येथे प्रतिपादन.

✒️ सुदेश आबूज
पिंपळनेर : महाराष्ट्राला मोठा अध्यात्मिक व सांस्कृतिक वारसा लाभलेला असून प्रगल्भ महाराष्ट्र घडविण्याचे काम संतांनीच केल्याचे सांगत त्याच भक्तिमार्गाचा वाटेवरून चालत ही परंपरा जोपासण्याचे काम राज्य सरकार करीत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केले. दरम्यान, पारनेर शहराच्या पाणी पुरवठा योजनेसाठी भरीव निधी देण्याची घोषणाही उपमुख्यमंत्री पवार यांनी केली.

पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथे आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमात उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. यावेळी निळोबाराय गाथाचे प्रकाशन तसेच गाथा वाड्याच्या जीर्णोद्धार कामाचा शुभारंभ ना. पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील,महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार निलेश लंके, माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदय शेळके, बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, पंचायत समितीच्या उपसभापती सुनंदा धुरपते, निळोबाराय देवस्थान समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव माऊली पठारे, कार्याध्यक्ष अशोकराव सावंत यावेळी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले की, राज्यावर कोरोनाचे मोठे संकट आले असतानाही यावर मार्ग काढत पालखी सोहळ्याची परंपरा महाविकास आघाडी सरकारने खंडित होऊ दिली नाही याकामी वारकरी संप्रदायानेही सहकार्याची भूमिका घेतल्याने त्यांना धन्यवाद देत अजित पवार म्हणाले की, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम केंद्र सरकारने हाती घेतले आहे. यात राज्य सरकारनेही आपला वाटा उचलला आहे या मार्गावर वृक्षारोपण करणे, मुक्कामाच्या ठिकाणी सुविधा निर्माण करणे यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
पारनेर शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी राबविण्यात येणार्‍या योजनेचे सर्वेक्षण झाले असून यासाठी आर्थिक तरतूद करण्याची मागणी आमदार निलेश लंके यांनी केली होती, यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना करीत पाणी योजनेसाठी आर्थिक निधीची तरतूद करण्याची ग्वाही दिली. तसेच पिंपळनेर येथील गाथा वाडयाचा जिर्णोद्धार व सभामंडपासाठी राज्य सरकारच्या वतीने 50 लाखांचा निधी जाहीर केला.
कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरी कोरोना अजून गेलेला नाही. रशिया, चीन, युरोप या देशात पुन्हा तिसरी लाट आल्याचे सांगत कोरोनाविषयी हलगर्जीपणा न करता गांभीर्याने काळजी घेण्याची तसेच दोन्ही लसीकरण करून घेण्याची आवश्यकता असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. कोरोनामुळे राज्य सरकारच्या अर्थकारणावर पर्यायाने विकास कामांवरही परिणाम झाल्याचेही ते म्हणाले.
आमदार निलेश लंके यांनी कान्हूर पठार परिसरातील 16 गावे, राळेगण-सिद्धी परिसरातील 14 गावांची, जामगाव परिसरातील 6 गावांची पाणीपुरवठा योजना तसेच जातेगाव पुणेवाडी येथील उपसा जलसिंचन योजनेसाठी निधीची तरतूद करण्याची मागणी केली. ढवळपुरी परिसरात एमआयडीसी झाल्यास बेरोजगारीचा प्रश्न सुटेल असे सांगत या परिसरात एमआयडीसीला मंजुरी देण्याची मागणीही आमदार लंके यांनी केली. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, चैतन्य महाराज देगलूरकर, महंत भास्करगिरी महाराज यांची भाषणे झाली. प्रास्ताविक देवस्थान समितीचे कार्याध्यक्ष अशोकराव सावंत यांनी केले.
याप्रसंगी डॉ. विकासानंद महाराज मिसाळ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे, राष्ट्रवादीच्या डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. बाळासाहेब कावरे, आत्मा कमिटीचे अध्यक्ष ॲड. राहुल झावरे,गोपाळकाका मकाशीर,उद्योजक सुरेशशेठ धुरपते, संदीप वर्पे, अशोक कटारिया,अशोक रोहोकले, राजेंद्र चौधरी, जितेश सरडे ,विक्रमसिंह कळमकर आदी उपस्थित होते. सुभाष पठारे यांनी सूत्रसंचालन केले.
आमदार निलेश लंके यांनी कोरोना काळातील केलेल्या कामांबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार लंके यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. ते म्हणाले, निलेश लंके यांच्या रूपाने पारनेरला चांगले नेतृत्व लाभले आहे. त्यांनी कोरोना काळात केलेल्या कामामुळे त्यांचे नाव जगभरात पोहोचले असून राज्यातील 288 आमदारांमध्ये आमदार लंके यांचे काम एक नंबर असल्याचेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.