Take a fresh look at your lifestyle.

शोधता न येणारी जखम म्हणजेच मनाला झालेला क्लेश !

आंतरीक दुःख बाहेरून दिसत नाही.

आपल्या शरीरावर झालेली जखम न सांगताही दुसऱ्याला दिसते.बहुतांश जखमा बाह्य उपचाराने बऱ्या होतात.त्या बऱ्या झाल्या की झालेल्या दुखण्याचा विसरही पडतो.पण शरीराच्या आतल्या जखमा बाहेरून दिसत नाहीत.त्यातही आतल्या जखमा वैद्यकीय साधनांनी शोधताही येतात.
कोणत्याही वैद्यकीय साधनांनी न शोधता येणाऱ्या जखमा म्हणजे मनाला झालेला क्लेश. तो दुसऱ्या कुणालाही शोधता येत नाही.त्या दुःख जखम गुप्तपणे वाढत असते.अर्थात त्याला पोषक घटक आपण स्वतःच पुरवत असतो.मनाला झालेली जखम वेळीच बरी करता आली नाही तर आयुष्य झपाट्याने कमी होत जाते. बुद्धी कमी वापरणारी माणसं जास्त जगतात आणि आनंदी असतात हे अगदी खरं आहे. खूप विचार करणं म्हणजे वैचारिक होणं नव्हे,तो भंपकपणा आहे.चांगले विचार करणं म्हणजे वैचारिकता आहे.
प्रत्येक जीवाला झालेलं दुःख विसरण्याची कला जन्मतःच आहे. पण माणुस नावाचा प्राणी त्याला अपवाद ठरतो.रात्रंदिवस दुःख कवटाळून जगणारी माणसं अर्धी मेलेलीच असतात.आणि ते असहाय्य झालं की मग स्वतः होऊन मरतात.मरायचं तर आहेच.पण मुक्कामाचं ठिकाण गाठल्यावरच मरण यायला हवं.नोकरीतुन निवृत्त होणं कसं असतं?परत कामावर जाणं हा विषय रहातच नाही. तो वेळ पाहिजे तिकडे देता येतो.
दुःखानं जर्जर झालेलं मन शरिराला आनंदी प्रक्रियेत जाऊ देत नाही. ते वारंवार जखमा दाखवत रहातं.त्यानं माझा अपमान केला,मला शिव्या दिल्या,त्यानं मला फसवलं,त्यानं मला बुडवलं,मला लुबाडलं.अगदी कळतं झाल्यापासूनची दुःख जशीच्या तशी ताजी असतात.
अगदी नवी जखम झाल्यासारखी. पण सुखाचे क्षण मात्र विरुन जातात.ते फार आठवत नाहीत. कुणी चांगलं बोललेलं आठवणीत रहात नाही. हे म्हणजे असं असतं की कितीही पंचपक्वान्न खाल्ली तरी ती लक्षात रहात नाहीत पण एखाद्या दिवशी जेवण मिळालं नाही की ते मात्र फार काळ लक्षात रहातं.
सज्जनहो तुमची आमची तऱ्हा एकच आहे. यातून कुणीही वेगळ जीवन जगत नाही.संतवचनच यातून आम्हाला मार्गदर्शन करणारं आहे.

तुकोबाराय म्हणतात, शरीर ते करी शरीराचे धर्म।नको देऊ वर्म चुको मना।।चाळण फिरवी ठाव बहुवस। न घडो आळस चिंतनाचा।। शरीर धर्म आपोआप घडणार आहे.मन निरोगी ठेवता येणं हीच कसरत आहे. शरीराच्या माध्यमातून ते काय करुन घेईल सांगता येत नाही. म्हणून हरी चिंतनाचा सतत प्रयत्न केला पाहिजे. त्याने मनाच्या जखमा धुवून जातात.क्षमा करण्याची शक्ती प्राप्त झाली की मनात जखमच शिल्लक रहात नाही.ज्यांना भरपूर आणि आनंदी जगायची इच्छा आहे. त्यांना आजचा हा लेख प्रपंच समर्पित आहे.
रामकृष्णहरी