Take a fresh look at your lifestyle.

पारनेर शहरातील पाणी पुरवठा योजनेसाठी ७५ कोटी रुपयांचा आराखडा : आमदार निलेश लंके

पारनेर : गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या पारनेर शहरासह वाड्या-वस्त्यांच्या पाणी पुरवठा योजनेसाठी ७५ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून आता जलशुद्धीकरणाच्या माध्यमातून पारनेर शहराला शुद्ध पाण्याचा पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांनी दिली आहे.
पारनेर शहराला थेट आता राहुरी तालुक्यातील वावर थ जांभळी येथील आरक्षित जलसाठातून पाणी आणण्याची योजना प्रस्तावित केली असून आमदार निलेश लंके यांच्या कार्यालयात यासंबंधी प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत बैठक संपन्न झाली आहे. पारनेर शहराला चोवीस तास पाणी पुरवठा करण्यासाठी ही मुळा धरणाच्या जलाशयातुन योजना राबवण्यात येणार असून स्थानिक पातळीवरील अडचणीवर यावेळी चर्चा करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांच्यासह जीवन प्राधिकरण योजनेचे प्रमुख अभियंता प्रसाद मुळे यांच्यासह नगरपंचायतीच्या सीईओ डॉ. सविता कुमावत, नगरसेवक नंदकुमार देशमुख, नगरसेवक किसन गंधाडे, नगरसेवक मुदस्सर सय्यद, नगरसेवक नंदकुमार औटी, नगरसेवक आनंदा औटी,डॉ. बाळासाहेब कावरे , श्रीकांत चौरे , विजय औटी , यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पारनेर शहरासह वाड्या – वस्तांना पाणीपुरवठा करण्यासाठी जांभळी येथे २०० एच पी चे विद्युत पंप बसविण्यात येणार असून हे पाणी ढवळपुरी येथील दुसऱ्या टप्प्यात असणाऱ्या २२५ अश्व शक्ती विद्युत पंपाच्या माध्यमातून कुंभार वाडी येथील प्रस्तावित जलशुद्धीकरण केंद्रातील ४६ किलो मीटर पाईपच्या या माध्यमातून पाणी सोडण्यात येणार आहे.
पारनेर शहराचे वाढते नागरीकरण लक्षात घेता आमदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे यासाठी विशेष निधीची मागणी केली होती. त्यानुसार ही पाणी योजना पूर्ण करण्यासाठी निधी देण्याच्या असूनसुद्धा त्यांना देण्यात आली होती त्यामुळे पारनेरच्या पाणी योजनेसाठी ७० ते ७५ कोटी रुपयांच्या प्रस्तावित योजनेचा आराखडा तयार केला गेला असून यासाठी ५ पाण्याच्या टाक्या वेगवेगळ्या ठिकाणी बांधण्यात येणार आहे. तसेच बंद पाईप द्वारे वाडी वस्त्यांना पाणीपुरवठा होणार आहे. यासाठी ४६ किलोमीटर पाईपलाईन टाकण्यात येणार असल्याची माहिती आमदार निलेश लंके यांनी दिली.