Take a fresh look at your lifestyle.

ज्ञानाची घमेंड अधःपतनाकडे नेते !

साधनेत राहुनच कल्याणकारी कर्म घडावे.

कोणत्याही क्षेत्रात ज्ञान प्राप्त झाले की सामान्य माणसं त्या व्यक्तीला मानाचं स्थान देतात.त्याची विशेष उठाठेव करतात. मात्र याचा अहंकार निर्माण होण्याची शक्यता फारच असते.त्यामुळे ज्ञान लोप पावतेच पण येणारे भोग भयंकर असतात.
दुसऱ्याला कमी लेखण्याची संधी आली तर ती गमवायला सहसा कुणी तयार होत नाही.मी इतरांपेक्षा विशेष आहे ही भावना खूप काही गमवायला लावते.शिवाय त्यामुळे होणारं अधःपतन दृष्टीस पडत नाही. थेट विनाश झाल्यावरच त्याचा बोध होतो,तेव्हा सुधारणा करता येत नाही.
माऊली म्हणतात,
नवल अहंकाराची गोठी।अज्ञान्याच्या न लगे विशेष पाठी।ज्ञानियाचे झोंबे कंठी।नाना संकटी नाचवी।।

बहुतांश संकटं मनुष्य अहंकार दुखावल्याने निर्माण करतो.गोष्टी किरकोळ असतात.पण स्वतःची लायकी न कळाल्याने असं घडतं.राग का येतो?हे ही लायकी न कळाल्यानेच घडतं.एखाद्या पदाची घमेंड ते करवुन घेते.पण इंद्राला सुद्धा पदच्युत व्हावं लागतं तिथं माणसाची काय गत?पद खालसा झालं की साऱ्या अहंकाराची जोपासना निचरते.त्यासाठी खाजगी सरकारी पदच असावं लागतं असं काही नाही. कुटुंब प्रमुख हे ही एक पदच आहे. इथं शिस्तबद्ध जीवन जगता आलं नाही की मग गच्छंती निश्चित आहे. मग ती वृद्धाश्रमात होईल की फुटपाथवर होईल सांगता येत नाही.
घमेंड कोणतीही वाईटच.ती जीरवण्याची व्यवस्था निसर्गतःच तयार आहे.जाणीव चांगलं जगण्याची संधी देते.पाय सतत जमिनीवर ठेवण्याची क्षमता जाणीव देते.नाथ महाराज म्हणतात,

जैसी स्थिती आहे तैशापरी राहे | कौतुक तू पाहे संचिताचे || ४ ||
संचित आमच्यावर नजर ठेवून आहेच.त्यायोगे प्रारब्ध भोगावं लागणारच आहे. मग नसते भोग वाढवावेत का?जे प्राप्त झालं आहे त्याचा आनंद घ्यावा.
रामकृष्णहरी