Take a fresh look at your lifestyle.

आपण डर्टी चिंतन करत आहात का?

ते इतरांविषयी करण्यापेक्षा स्वतः विषयीच केले पाहिजे.

 

आपल्याला हा मोह अनेकदा होतो,एखाद्याला पाहिलं की याचा खालच्या भाषेत उद्धार करावा,मुस्काडावं,उघडा नागडा करून मारावा,याचं खरं रुप जगासमोर आणावं.पण हे सारं आपल्या मनात चाललेलं असतं.प्रत्यक्ष अमलात येत नाही.अशाच माणसांविषयी आपणाला अनेकदा चांगलं बोलण्याची वेळ येते.त्यांचा सत्कारही करण्याची वेळ येते.त्यावेळी आपण हे सारं निर्लज्जपणे करतो.त्यावेळी आपण आपला सतसद्विवेक झाकून ठेवलेला असतो.

त्याहून जास्त त्रास या गोष्टीचा होतो की त्यांची साथसंगत करणारी चांगली माणसं त्यांच्या सोबत दिसतात तेव्हा.असे प्रसंग आपल्यावर आले असतील. माझ्यावर असा प्रसंग आला की मग स्वतःला मी प्रश्न विचारतो, कोण चांगलं कोण वाईट,कुणाच्या पाप पुण्याचा हिशोब मांडण्या इतकं आपलं ज्ञान समर्थ आहे का?आपण कधी चुकीचं वागलोच नाही का?आपण तेवढे शहाणे आहोत का?
तर त्याचं उत्तर नाही असं आहे.त्यामुळे आपल्याला जी माणसं योग्य वाटतील,आवडतील त्यांच्याच सोबत रहाणं इतकच आपल्या हातात आहे.

घाणीतुन जाताना आपण घाण होणार नाही एवढीच काळजी घ्यावी. तसे प्रसंग वारंवार येणार आहेत. विनाशकारी व्यक्तींपासुन लांब रहाणं आपल्या हातात आहे.इतर व्यक्तींविषयी विनाकारण चर्चा, चिंतन करु नये.त्याने आनंद नाहीसा होतो.आपलं मन आपल्याला अपराधी म्हणणार नाही असं जगता आलं की मग आपल्या विषयी कोण काय म्हणत असेल याची चिंता आपणही का करावी?
पण समाजात वाद निर्माण करणारं कोणतही काम निरपराध व्याख्येत बसत नाही हे कायमच लक्षात ठेवण्यासारखं आहे.

माऊली म्हणतात,
रामकृष्ण नामें ये दोन्ही साजिरी ।
हृदय मंदिरी स्मरा कां रे ॥१॥
आपुली आपण करा सोडवण ।
संसार बंधन तोडा वेगीं ॥२॥
राम व कृष्ण ही दोन सुंदर नामे हृदयरूपी मंदिरात नित्य स्मरून आपली आपणच सोडवण करून घ्या.व संसार बंधन लवकर तोडुन टाका.आपण संसारबंधन तोडण्याला शब्दातीत करु नये.हव्यास थांबला की बंधनमुक्त होता येते.ती गती गाठण्यासाठी अध्यात्मीक जीवन हे रामबाण आहे.
रामकृष्णहरी