Take a fresh look at your lifestyle.

नगर जिल्ह्यात पुन्हा जमावबंदीचे आदेश !

'इतके' दिवस राहणार जमावबंदी लागू.

 

नगर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे बंद ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात अद्यापही आंदोलने सुरू आहेत. त्यातच आता गणेशोत्सवात मंडळाच्या गणेश मूर्तीचे प्रत्यक्ष मुखदर्शन घेण्यास मनाई करण्यात आल्यानंतर विरोधकांकडून आंदोलन केली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने २४ सप्टेंबरपर्यंत जमावबंदीचा आदेश दिला आहे.

नगर जिल्ह्यासाठी जमावबंदीचा आदेश देताना जिल्हा दंडाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी त्याची कारणे आदेशात नमूद केली आहेत. पोलीस अधीक्षकांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार कलम ३७ (१) (३) नुसार म्हणजेच जमाव व शस्त्रबंदीचा आदेश देण्यात आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे की, ‘सध्या जगभरात व राज्यात कोरोना विषाणू प्रादुर्भावाची दुसरी लाट सुरू आहे.नगर जिल्ह्यात कोविड रुग्ण इतर जिल्ह्याच्या तुलनेत जास्त असल्याचे दिसून येत आहे. सरकारच्या ब्रेक द चेन संबंधीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक ते आदेश यापूर्वीच देण्यात आलेले आहेत. मधल्या काळात विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ चे आदेश यापूर्वी निर्गमित केले होते. ते आता शिथील करण्यात आले आहेत. आता गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. यामध्ये समाजकंटक व गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून किरकोळ कारणावरुन कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता सरकारकडून मिरवणुकीत, धार्मिक कार्यक्रमात गर्दी करु नये, तसेच गणेश मूर्तीचे मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष दर्शन घेण्यास मनाई करण्यात आलेली आहे. यासंबंधी सरकारने सार्वजनिक गणेश मंडळांना सूचना दिलेल्या आहेत,’ अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

▪️’या’ काळापर्यंत असणार जमावबंदी.

‘सरकारच्या मिरवणूक मनाई व प्रत्यक्ष मुखदर्शन न घेणे बाबतच्या आदेशाविरुद्ध विविध संघटना, राजकीय पक्ष यांची आंदोलने होऊ शकतात. त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात गर्दी करुन प्रशासनास वेठीस धरुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यामध्ये विविध राजकीय पक्ष, कामगार संघटनांतर्फे त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मोर्चे, धरणे आंदोलने, रस्ता रोको कार्यक्रम घेऊन मोठ्या प्रमाणात गर्दी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांना कर्तव्य बजावताना अडचण निर्माण होऊ नये, यासाठी जमावबंदीचा आदेश लागू करण्यात येत आहे. हा आदेश दि.१० ते २४ सप्टेंबर या काळात लागू राहणार आहे,’ असेही या आदेशात म्हटले आहे.

▪️जमावबंदी काळात ‘अशी’ बंधने असणार.

पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र येणे, मिरवणूक काढणे, लाठ्या काठ्यांसह अन्य शस्त्र जवळ बाळगणे, मोर्चे, आंदोलन करणे, घोषणा देणे, प्रक्षोभक भाषण करणे, सभ्यता अथवा नितीमत्तेला धोका पोहोचेल असं कोणतंही कृत्य करणे, अशा गोष्टींना जमावबंदी आदेशानुसार बंदी घालण्यात आली आहे.