Take a fresh look at your lifestyle.

“त्या” दृश्यावरून ‘जय भीम’ सिनेमा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात !

निर्मात्यांना बजावली मानहानीची नोटीस.

मुंबई– नुकताच प्रदर्शित झालेला ‘जय भीम’ चित्रपट पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील एका दृश्यावरून बराच वाद झाला होता. यात प्रकाश राज यांची व्यक्तिरेखा चित्रपटातील एका हिंदी भाषिक व्यक्तीच्या कानशिलात लगावताना दिसते. आता अशी माहिती आहे की, वन्नियार संगम ने चित्रपटाच्या निर्मात्यांना मानहानीची नोटीस बजावली आहे. यासोबतच ५ कोटींची भरपाईही मागितली आहे.
वन्नियार समाजाच्या सन्मानाला आणि प्रतिष्ठेला कलंक लावणारी बदनामीकारक दृश्य जाणीवपूर्वक चित्रपटात टाकण्यात आली असल्याचा आरोप वन्नियार संगमच्या प्रदेशाध्यक्षांनी केला आहे. नोटीसमध्ये एका दृश्याचाही उल्लेख करण्यात आला आहे, ज्यामध्ये वन्नियार समुदायाचे चिन्ह ‘अग्निकुंडम’ दाखवण्यात आले आहे.
निर्मात्यांना पाठवलेल्या कायदेशीर नोटीसमध्ये वन्नियार समाजाच्या प्रदेशाध्यक्षांनी चित्रपटातून बदनामी करणारी सर्व दृश्य काढून टाकण्याची मागणी केली आहे. तसेच ‘अग्निकुंडम’ चिन्हाचा चित्रपटात जाणीवपूर्वक समावेश करण्यात आल्याचा दावाही नोटीसमध्ये करण्यात आला आहे.
या नोटीसमध्ये चित्रपटातील वादग्रस्त दृश्य हटवण्याच्या मागणीसोबतच ७ दिवसांत ५ कोटींची भरपाई देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. ‘जय भीम’ नुकताच अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात प्रकाश राज व्यतिरिक्त सूर्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.