शिर्डी : येथील साईबाबा मंदिरात दर्शनासाठी आता ऑफलाइन पास देण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. आज (बुधवारी) दुपारपासून ही सुविधा सुरू होणार आहे. त्यामुळे पूर्वीचे १५ हजार ऑनलाइन आणि आणखी १० हजार ऑफलाइन असे २५ हजार भाविक दररोज दर्शन घेऊ शकणार आहेत. शिर्डी संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी जिल्हा प्रशासनाकडे यासंबंधीची मागणी केली होती. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ही मुभा दिली आहे.
कोरोना नियमांचे पालन करून शिर्डी मंदिर परिसरात या पासचे वाटप होणार आहे. मात्र, भाविकांनी गैरसोय टाळण्यासाठी शक्यतो ऑनलाइन बुकिंग करूनच यावे, असे आवाहन शिर्डी संस्थान तर्फे करण्यात आले आहे. कोरोना काळात मंदीर खुले करण्यास परवानगी देताना फक्त ऑनलाइन दर्शनाची मुभा देण्यात आली होती. मात्र, नंतर कोरोनाचे प्रमाण कमी झाले तरीही हीच पद्धत कायम होती. दरम्यान, शिर्डीत भाविकांची गर्दी वाढू लागली.
ऑनलाइन पास मिळण्यात अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे भाविकांना त्रास सहन करावा लागत होता, तर संस्थानलाही भाविकांच्या रोषाला समोरे जाण्याचे प्रकार घडू लागले होते. या पार्श्वभूमीवर संस्थानचे अध्यक्ष आमदार काळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे यासंबंधीच्या मागण्या केल्या.
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे सर्वच देवस्थानाबरोबरच देश-विदेशातील कोट्यवधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीमध्ये देखील भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र दर्शनासाठी केवळ ऑनलाइन सुविधा उपलब्ध असल्यामुळे ही ऑनलाइन किचकट प्रणाली सर्व सामान्य असंख्य साई भक्तांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी दिवसेंदिवस भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दर्शनासाठी केवळ ऑनलाइन सुविधाच उपलब्ध असल्यामुळे असंख्य भाविकांना साईबाबांचे दर्शन न घेताच परतावे लागत आहे. त्यामुळे साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी ऑफलाइन दर्शन सुविधा सुरू करावी. तसेच बंद असलेले भोजनालय सुरू करावे.
ऑनलाइन दर्शन पास प्रणालीत मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याचे साई भक्तांमधून बोलले जात असून त्यामुळे साई भक्तांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. ही बाब ध्यानात घेत ऑफलाइन दर्शन खुले करण्यात यावे अशी मागणी काळे यांनी केली होती. ती मान्य करण्यात आली आहे.