Take a fresh look at your lifestyle.

आपण आनंदी जीवन जगत असु तर कुणामुळे?

आपलं जीवन दुःखमय झालं असेल तर याला जबाबदार कोण?

आपल्याला सुखात कुणाची आठवण होत नाही पण दुःख वाट्याला आलं तर त्याचं खापर कुणावर तरी फोडण्यासाठी आपण सज्ज असतो.आमक्यामुळे माझ्या वाट्याला हा भोग आलाय हे सांगण्यात धन्यता वाटते पण आमक्यामुळे मी आज हे आनंदी जीवन जगतो आहे हे सांगणारा विरळाच.मुळात सुखानूभुती किंवा दुःखानूभुती निर्माण होतेच कशी या विषयी आपण पारच अनभिज्ञ नसलो तरी सत्यापासुन बऱ्यापैकी दुरही आहोत.

आपण असं अनेकदा बोलुनही दाखवतो की मी शुन्यातुन विश्व निर्माण केलं आहे.पण या विश्वात दुःख आलं तर तेही मीच निर्माण केलय असं कधीच मान्य करीत नाही.परंतु सत्य हेच आहे. इथं देवदैवाचा,नशिबाचा संबंध पुर्ण गैर आहे.दुसऱ्याने माझं चांगलं केलं अथवा वाटोळं केलं हे म्हणणं केवळ तात्विकदृष्ट्याच योग्य आहे.सत्याधिष्टीत जीवनचक्रात कर्मसिद्धांतात हे बसतच नाही. स्वकर्मच या सगळ्याला जबाबदार आहे.

तुकोबाराय म्हणतात,

भोग तो न घडे संचितावाचुनी।करावे ते मनी समाधान।।

म्हणवूनि मनीं मानु नयें खेद।म्हणावा गोविंदु वेळोवेळां।।

अणिकां रुसावें न लगे बहुतां।आपुल्या संचिता वाचुनिया।।

तुका म्हणे भार घातलियावरी।होईल कैवारी नारायण।।

आपल्या वाट्याला आलेलं सुख अथवा दुःख हे केवळ आपल्या वागणुकीचा,आचार विचारांचा,नितीमत्तेचा परिपाक आहे.माझ्या पहाण्यात आलेली एक सत्य घटना एका आदर्श शिक्षकावर अत्यंत वाईट वेळ आली अगदी बेघर होऊन जगण्याची वेळ आली.पण ते त्या परिस्थितीत अजिबात विचलीत झाले नाही.ते शैक्षणिक ज्ञानाबरोबरच अध्यात्मिक ज्ञानानेही परीपूर्ण होते.त्यांनी ते जगणेही आनंदाने स्विकारले.एक दिवस रस्त्याने जात असताना एका अलिशान कारसमोर ते चक्कर येऊन पडले.मागच्या सीटवर बसलेले साहेब घाईघाईने खाली उतरले,त्यांच्या जवळ जाऊन विचारले,तुम्ही ×××सर ना?सर मी तुमचा विद्यार्थी.आज मी तेरा कंपन्यांचा मालक आहे. आणि ते केवळ तुमच्या संस्कारामुळे.माझी परिस्थिती अत्यंत वाईट होती,माझा शैक्षणिक खर्च तुम्ही उचललात म्हणून मी आज सन्मानाने उभा आहे.आपल्या गुरुंना त्याने कारमध्ये बसवलं आणि दवाखान्यात नेलं.इतकच नाही तर त्यांना कायमच आपल्या घरी स्थान दिलं.

 

आज ते एका कंपनीचा कारभार पहात आहेत.नोकरचाकर त्यांच्या दिमतीला आहेत. अनेक गरजु विद्यार्थ्यांना ते मोफत मार्गदर्शन करीत आहेत.त्यांच्या विद्यार्थ्यामुळे त्याची दशा बदलली असं तात्विकदृष्ट्या म्हणता येईल. पण हे तितकसं खरं नाही.ही गोड जीवनाची पेरणी सरांनी आधिच करुन ठेवल्याने हा सुखद काळ वाट्याला आला हे त्याचं खरं उत्तर आहे.नियतीने दिलेले आयुष्य किती गोड जगायचं हे आमच्याच हातात आहे. त्यानुसार ते कर्मगतीने कमी करता येते पण वाढवता येत नाही.आपली संचितकर्माची ठेव आपली इच्छा असु अगर नसु ती भोगावी लागतेच.मात्र भोग आणि जीवन यामधे माध्यम म्हणून मनुष्यच असणार हे लक्षात ठेवले पाहिजे. कारण प्रत्येक कर्म मनुष्यसंबंधानेच घडत रहाते.त्यामुळे आपण म्हणतो आमक्यामुळे असं झालं,तमक्यामुळे असं झालं.पण त्यात काही तत्थ नाही.

त्यामुळे तुकोबाराय म्हणतात, रुसायचच तर आपल्या संचितावय रुसा.आणि या त्रासाची तिव्रता कमी व्हावी असं वाटत असेल तर त्या गोविंदाचं स्मरण करा.त्यानं सत्य स्विकारण्याची क्षमता निर्माण होईल. आणि दुःखातही सहजभावाने जगता येईल.

रामकृष्णहरी