Take a fresh look at your lifestyle.

भोंदू मनोहर मामा भोसले पोलिसांच्या ताब्यात !

साताऱ्यात झाली कारवाई;अटक होणार.

 

बारामती : संत श्री बाळूमामांचा अवतार असल्याचे सांगत बारामतीतील युवकाची फसवणूक केल्याप्रकरणीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या मनोहर उर्फ मामा भोसले (वय 39, रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) याला पुणे ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा व बारामती तालुका पोलिसांनी साताऱ्यात पकडले. त्याला ताब्यात घेण्यात आले असून लवकरच अटक केली जाणार आहे.

मनोहर भोसलेला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिली.मनोहर भोसले, विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा आणि ओंकार शिंदे या तिघांविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात फसवणूकीसह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा व उच्चाटन कायदा तसेच औषध चमत्कारी उपाय अधिनियमानुसार गुन्हा दाखल कऱण्यात आलेला आहे.

बारामती येथील शशिकांत सुभाष खऱात यांच्या वडीलांच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मनोहर भोसले याने बाळूमामाचा अवतार असल्याचा बनाव करत फिर्यादीच्या वडीलांच्या गळ्यातील थायराईड कर्करोग बरा करतो असे सांगत बाभळीचा पाला, साखर, भंडारा खाण्यास दिला. विशाल वाघमारे, शिंदे यांच्याशी संगनमत करत वडीलांच्या व फिर्यादीच्या जिविताची भिती घालून फिर्यादीकडून वेळोवेळी 2 लाख 51 हजार रुपये घेत फसवणूक केली. पैसे परत मागितले असता जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.

 

दरम्यान काल गुरुवारी (दि. 9) मनोहर भोसले विरोधात करमाळ्यात एका महिलेने बलात्काराची फिर्य़ाद दाखल केली. त्यामुळे त्याच्यापुढील अडचणी वाढल्या होत्या. त्याच्यावर मोठा राजकिय वरदहस्त असल्याने पुढे काय होते, याची उत्सुकता होती. परंतु कोणत्याही दबावाला न जुमानता पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याला बारामती तालुका पोलिस ठाण्यात आणत अटक केली जाणार आहे.