युवकांनो हा लेख प्रपंच तुमच्यासाठी आहे.पुढचे दात आतुन स्वच्छ करता का?
सकाळी उठल्यावर आपण नित्यनियमाने दात घासत असतो.खास करून पुढचे दात कसे पांढरेशुभ्र दिसतील,यावर घासणं चालू असतं.पण पुढच्या दातांचा आतील भाग जरा आरशात पहा.आरशात पहायला सुद्धा त्रास होईल, अरे!हो,हो,हो.लगेच नका पाहु.लेख तर वाचा!कुणाकुणाचे तर काळेच झाले असतील. कुणाचे पिवळे,तांबूस झाले असतील. आपण काही व्यसन करत असाल,तर याहुन परिस्थिती गंभीर असेल,हे सांगणे नको.
तुम्हाला प्रश्नही पडला असेल की आज काय डेंटिस्ट व्हायचा मुड आहे का? त्यासाठी नाहीच हे.पुढचे दात समाजाला दिसतील, मात्र दाताची आतली बाजू समाजाला दिसत नाही. म्हणून आतल्या परिस्थिती विषयी फार काही काळजी करत नाही आपण. पण नुकसान समाजाचं होणार नाही,तर आपलं होणार आहे हे निश्चित.कधी ना कधी दंतक्षय होणार हेही निश्चित.
आपलं आयुष्यही असंच आहे.आपले विकार लोकांना दिसु नये,म्हणून झाकपाकीचं आयुष्य जगत राहिलात तर आपला विनाश आपले विकारच करतील हे पक्क ध्यानात ठेवा.म्हणून आतुन स्वच्छ होण्यावर भर द्या.शारीरिक शुद्धते बरोबरच मानसिक शुद्धीकरण खुपच महत्त्वाचे आहे. आतून जे येईल तेच आनंद देईल.ओठांवर एक आणि पोटात एक हे तर सर्वत्र पहायला मिळेल.
निरोगी समाजासाठी निरोगी मन असणं अपरिहार्य आहे.ते जीवन तुम्ही जगावं.जगण्याचं राजकारण केलत तर वाया गेलेच म्हणून समजा.जगा आनंदाने खुल्या पुस्तकासारखं.त्यासाठी आतुन स्वतः स्वच्छ व्हा. स्वतः ला घडविण्यासाठी वेळ द्या.शक्य झालं तर दातांचा आतला सेल्फी अपलोड करा.मग लक्षात येईल बाह्यांगाचा सेल्फी किती फसवा आहे.
माझ्या युवक मित्रांनो मला ज्या गोष्टी केल्याने अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं,त्या गोष्टी तुमच्या हातुन घडु नयेत. यासाठी हा त्रागा आहे.आपल्या आईवडिलांना देव मानुन त्यांच्या आज्ञा पाळाल तर दुःख कधीही वाट्याला येणार नाही. कारण तुम्ही खास आहात. काहीतरी खास करण्यासाठी तुमचा जन्म आहे,हे झोपेत सुद्धा विसरु नका.