Take a fresh look at your lifestyle.

नगरमधील “या” व्यावसायिकांना तब्बल 82 कोटींचा दंड !

तहसिलदारांच्या धडक कारवाईने धाबे दणाणले. 

 

नगर : गौण खनिज उत्खनन हा एक गोरख धंदा बनून राहिला आहे, त्याला चाप बसविण्याच्या उद्देशाने शासनाने 1 एप्रिल 2020 ते ऑक्टोबर 2020 या काळातील वीज वापर आणि भरलेली रॉयल्टी यांची तपासणी केली असता त्यात मोठी तफावत आढळून आली.त्यानुसार नगर तालुक्यातील 24 खडी क्रशर धारकांना 82 कोटी 10 लाख 68 हजार 800 रुपयांचा दंड करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील सर्वाधिक खडी क्रशर नगर तालुक्यात आढळून येतात. खंडाळा, घोसपुरी, कापूरवाडी, वारूळवाडी, पोखर्डी, घोसपुरी, उक्कडगाव, या भागात मोठ्या प्रमाणात दगड खाणी आणि क्रशर आहेत .बहुतांश ठिकाणी वीज चोरी, रॉयल्टी चोरी असे विविध गैरप्रकार करून स्थानिक अधिकाऱ्यांना हाताशी धरत शासनाला फसवले जात आहे.
शासनाला भरलेल्या रॉयल्टी पेक्षा मोठ्या प्रमाणात उत्खनन आणि क्रशिंग केले जात आहे.त्यातून मोठ्या प्रमाणात शासनाचा महसूल बुडत आहे.त्यावर एक उपाय म्हणून नाशिक विभागीय आयुक्त यांनी नगर जिल्ह्यातील प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांना वीज बिल वापर नुसार झालेले क्रशिंग आणि त्या क्रशर धारकाने भरलेली रॉयल्टी याची क्रॉस चेकिंग करण्यास सांगितले. प्रत्यक्ष पहाणी केली असता 1 ब्रास दगड क्रश करण्यासाठी 13 युनिट विजेचा वापर होत असल्याचे आढळून आले.
त्यानुसार 1 एप्रिल 2020 ते ऑक्टोबर 2020 या 7 महिन्यातील वीज वापर आणि झालेले क्रशिंग यांचा आढावा घेतला असता त्यामध्ये मोठी तफावत आढळून आली .शासनाकडे भरलेल्या रॉयल्टी पेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात क्रशिंग केले असल्याने त्यात शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविल्याचे निदर्शनास आले आहे.त्यानुसार संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येऊन खुलासे मागविण्यात आले होते पण समाधानकारक खुलासे देऊ न शकल्याने नगर तालुक्यातील 24 क्रशर धारकांना 82 कोटी 10 लाख 68 हजार 800 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून त्यांच्या मालमतेवर बोजा चढविण्यात आला आहे. शासनाने केलेल्या या कारवाईचे सर्वसामान्य वर्गातून मोठे कौतुक होत आहे तर क्रशर चालकांचे धाबे दणाणले आहेत.

दंड ठोठावण्यात आलेले क्रशर आणि मालक : रावसाहेब जबाजी कराळे मायंबा स्टोन क्रशर, नाथ प्रसाद स्टोन क्रशर, समृद्धी स्टोन क्रशर, आरोही बिडकाँन, अनिल बाळू कराळे, साई क्रश सॅन्ड, नाथ सहारा स्टोन क्रशर, (सर्व कापूरवाडी)
भैरवनाथ एन्टरप्रयझेस, ब्लॅक स्टोन क्रश सॅन्ड, गणेश क्रश मेटल, मयुरेश्वर स्टोन क्रशर, गजानन स्टोन क्रशर, वेताळ स्टोन क्रशर, जय भवानी स्टोन क्रशर, तुकाराम निवृत्ती (सर्व पोखर्डी) शुभम स्टोन क्रशर, साई स्टोन क्रशर, श्री हरीश मेटल वर्क,सह्याद्री स्टोन क्रशर (सर्व खंडाळा)प्रकाश कर्डीले (वारुळ वाडी), लता साबळे (भोर वाडी) संतोष शिंदे (सारोळा कासार)

नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय आदेशानुसार नगर तालुक्यातील क्रशर ची तपासणी करण्यात आली. 32 क्रशर चालकांना त्यांचे उदभव बाबत खुलासे मागविण्यात आले होते त्यातील 8 क्रशर चालकांनी दिलेले खुलासे मान्य करण्यात आले, उर्वरित 24 क्रशर चालकांचे खुलासे मान्य करण्यासारखे नव्हते त्यामुळे शासकीय नियम आणि वरिष्ठ कार्यालय आदेशानुसार त्यांना दंड करण्यात आला आहे. महसूल अधिनियमानुसार वसुली ची पुढील कार्यवाही सुरू आहे.
उमेश पाटील
तहसीलदार ,नगर तालुका