Take a fresh look at your lifestyle.

एस.टी.कर्मचाऱ्यांच्या प्रश्नात अण्णा हजारेंचे लक्ष !

मुख्यमंत्रांशी बोलणार -अण्णा हजारे 

पारनेर :एस.टी.कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन पत्रव्यवहार करणार असल्याचे आश्वासन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले.
राज्य परिवहन महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्यासह विविध मागण्यांसाठी राज्यभर एस.टी.कामगार आणि कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. राज्यभरातील अनेक बस डेपोचे कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. बसस्थानक परिसरात शुकशुकाट पहायला मिळत आहे. एस. टी. कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. दिवसेंदिवस एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न जटील बनत चाललाय. मात्र शासनाकडून अजूनही कुठलंही ठोस आश्वासन मिळत नसल्याने पारनेर येथील एस टी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने राळेगणसिद्धी येथे येऊन जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांची भेट घेत आपल्या समस्या हजारे यांच्या जवळ मांडल्या.
यावेळी आबा भोंडवे, सचिन थोरात, सुरेश औटी, गणेश चौधरी, मच्छिंद्र शिंदे, संदिप शिंदे, बापू शिंदे, अरुण मोकाते, नितीन सुरवसे, स्वरूपा वैद्य, कल्पना नगरे, सविता शिंदे आदींनी हजारे यांची भेट घेतली.
यावेळी शिष्टमंडळाशी बोलताना अण्णा हजारे यांनी सांगितले की, कोणतेही सरकार फक्त आंदोलनाला घाबरत नाही तर, ते पडण्याला घाबरते आंदोलानांच्या माध्यमातून जनमताचा रेटा तयार केल्यास त्याला घाबरून सरकार जनतेच्या मागण्या मान्य करते. त्यासाठी सर्वांनी एकत्रित येत राज्य सरकारवर दबावशक्ती निर्माण करावी, असं आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातील शिष्टमंडळाशी बोलताना केले.
एस. टी.कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार असून त्यांना पत्र पाठवून देण्याबाबतचे आश्वासन यावेळी त्यांनी आंदोलकांना दिले. गेल्या १७ दिवसांपासून सुरु असलेले आंदोलन अहिंसेच्या मार्गाने सुरु राहू द्या. आंदोलन करत असताना कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेचे आपणाकडून कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची काळजी सर्व आंदोलकांनी घेतली पाहिजे. त्याबरोबरच आपल्याकडून सार्वजनिक मालमत्तेचे जतनही झाले पाहिजे असा सल्लाही अण्णांनी यावेळी आंदोलकांना दिला.