Take a fresh look at your lifestyle.

अबब…! छोट्याश्या कागदाची किंमत ३ कोटी ?

नक्की प्रकरण काय ? पाहूयात...

एखाद्या कागदाची किंमत किती असू शकते? याचा अंदाज तुम्ही लावू शकणार नाही. कारण एका कादंबरीच्या मूळ स्क्रिप्टचे एक पान तीन कोटी रुपयांना लिलावात विकले गेले आहे. यात विशेष काय? नक्की प्रकरण काय? पाहूयात…     
शेरलॉक होम्स या काल्पनिक डिटेक्टिव्हबाबत आजही सर्वांना उत्सुकता आहे. हे काल्पनिक डिटेक्टीव्ह पात्र निर्माण करणारा लेखक आर्थर कॉनन डायल यांच्या विषयी लोकांना जाणून घ्यायचे आहे. त्यामुळेच होम्स नायक असलेल्या हाऊंड ऑफ द बास्करविल्स या गाजलेल्या कादंबरीच्या मूळ स्क्रिप्टचे एक पान तब्बल तीन कोटी रुपयांना लिलावात विकले गेले आहे. 20 सेंटीमीटर बाय 30 सेंटिमीटर आकाराचा या कागदावर या मूळ कादंबरीचे काही लिखाण आहे.
टेक्सासच्या दलासमधील एका खाजगी संग्रहकाने लिलाव प्रक्रियेत हा कागद विकत घेतला. लेखक सर डोईल यांच्या अक्षरातील या कागदावर प्रकरण-8 फिक्सिंग द नेटस असा मजकूर आहे. त्यामध्ये होम्स आणि त्याचे सहकारी डॉक्टर वॉटसन यांच्यातील संभाषण आहे. या पानावर लेखक डायल यांनी काही खाडाखोड करून त्या ठिकाणी नव्याने मजकूर लिहिल्याचेही दिसत आहे.
या कादंबरीची मूळ प्रत 185 कागदांची होती. मात्र आता फक्त पस्तीस पाने शिल्लक आहेत. लेखकाने 1902 मध्ये ही कादंबरी लिहिली. त्यापूर्वी आठ वर्षांपूर्वी लेखकाने होम्सचे पात्र संपवले होते. पण हजारो वाचकांच्या आग्रहास्तव या कादंबरीच्या निमित्ताने डायल यांनी पुन्हा एकदा शेरलॉक होम्सला जिवंत केले. त्यामुळे या कादंबरीचे विशेष महत्त्व मानण्यात येते.