शिरुर : न्हावरे येथील पत्रकार संजय गायकवाड यांच्या अपघातग्रस्त मुलावर उपचार करण्यास नकार देणाऱ्या रुबी हॉस्पिटलच्या कारभाराविरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा शिरूरचे आमदार अशोक पवार यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना पत्र दिले आहे.
न्हावरा येथील विश्वजित संजय गायकवाड (वय १५) या मुलाचा ३ नोव्हेंबर रोजी अपघात झाल्याने त्याच्या मेंदुला मार लागला होता. त्याच्या उपचारासाठी त्याला रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक असतानाही त्यांनी उपचारासाठी १ लाख ८ हजार रुपये हॉस्पिटलकडे जमा केले होते. मात्र, आणखी पैसे भरण्यास सांगितल्यानंतर मात्र, संबंधित कुटुंबाला ते देता आले नाहीत.
रुग्णालय प्रशासनाने बिलाचे पैसे देता येत नसल्यास रुग्णाला घरी घेऊन जा अशा शब्दांत सुनावले. दरम्यान संबंधित रुग्णाच्या कुटुंबांने धर्मादाय आयुक्तांच्या सवलतीतून उपचारासाठी अर्ज केला होता. त्यावरही निर्णय न घेता त्याला रुग्णालयाने उपचार करण्यास नकार दिला. त्यामुळे पवार यांनी संताप व्यक्त करत रुग्णालय प्रशासनास चांगलेच धारेवर धरले.
पवार यांनी धर्मादाय आयुक्त काटकर यांना याबाबत कल्पना दिली. त्यांनीही पवार यांच्यासोबत रुग्णालयात संबंधित डॉक्टरांची कानउघाडणी केली. रुग्णालय प्रशासनाने त्यानंतर माफी मागत उपचार करण्यास होकार दिला. त्यानंतरही पवार यांनी रुबी हॉस्पिटलविरोधात अनेक तक्रारी असल्याने त्यांच्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे या मागणीसाठी उपोषणाचा निर्धार कायम ठेवला आहे. त्यानुसार ते आज १२ नोव्हेंबर रोजी उपोषणास बसणार असल्याचे सांगितले आहे.