Take a fresh look at your lifestyle.

मनुष्याला तीन प्रकारची दुःखं आहेत !

ज्ञानानेच दुःखावर विजय मिळवता येतो.

मनुष्याच्या जीवनात तीन प्रकारची दुःख आहेत.पहिलं म्हणजे दारिद्रय, दुसरं पाप,आणि तिसरं मृत्युभय. दारिद्र्यात रहाणाराला रात्रंदिवस एकच चिंता असते की धन मिळवण्यासाठी काय करावं?दारिद्र्याचं दुःख त्याला सतावत असतं.त्यामुळे त्याची संपूर्ण परिवार दारिद्रय भोगत असतो.
व्याभिचारी मनुष्याला सतत पापाचं भय असतं.बाह्यांगाने तो कितीही सोज्वळ प्रतिमा तयार करत असला तरी अंतरीचा चित्रगुप्त त्याला सतत पापकर्माची जाणीव करुन देत असतो.शिवाय याची परतफेड करावी लागेल याची सुक्ष्म जाणीव सुद्धा त्याला असते. तिसरं दुःख हे सर्व मनुष्य जातीला आहे. मृत्युचं भय कुणाला वाटत नाही?सर्वांना वाटतं,कारण कुणालाही मरावसं वाटत नाही. दारिद्रय कितीहघ असलं तरी जगण्याची इच्छा आहे, पाप कितीही केलं तरघ मरावसं वाटत नाही. म्हणजे मृत्युभय सर्वांना आहे.

मनुष्य उचित कर्मगतीने दारिद्रय नाहिसं करुन श्रीमंत होऊ शकतो.श्रीमंतीने दारिद्रय नाहिसं करता येईल.पुण्यकर्माने पापकर्मगती थांबवता येईल. त्याने पापभोगाद्वारे येणाऱ्या मानसिक आणि शारीरिक विकारांना थांबवता येईल.परंतु या दोन दुःखांवर जरी जय मिळवता आला तरी मृत्युभय कायम आहे.हे भय नाहीसे झाल्या खेरीज मनुष्य देह अनमोल असल्याचा आनंद होत नाही.
एका दरिद्री मनुष्याने आपलं मोडकळीस आलेलं घर कर्ज काढुन बांधायला काढलं. जुनं घर पाडताना तो झोपायचा त्या ठिकाणी खांदल्यावर त्याला धनाचा हंडा सापडला. त्याला अपार आनंद झाला.कर्जही फिटले,घरही झाले आणि पुढील आयुष्य श्रीमंती अनुभवता आली.तो मनात वारंवार म्हणायचा आख्ख आयुष्य दारिद्र्यात गेलं.माझ्या उषाला धनाचा हंडा होता पण कळालं नाही.

सज्जनहो ब्रम्हज्ञान हा असाच धनाचा हंडा आहे. जो प्राप्त झाला की मग मृत्युभय नाहिसे होते.नित्य आनंद अनुभवता येतो.जे मिळालय त्याचा आनंद घेता येणं म्हणजे पुर्णानंद आहे. पण ही ब्रम्हज्ञानाची प्राप्ती आपोआप होणार नाही. ज्ञान शब्द आला की गुरुसंबंध अटळ आहे. गुरु शिवाय कोणत्याही ज्ञानाची प्राप्ती होत नाही. त्यातही ब्रम्हज्ञान हे सर्वोच्च आहे. त्यासाठी सदगुरु आवश्यक आहे. जो पथ्य न सांगता आजार बरा करतो तो सर्वोच्च वैद्य सांगितला आहे तसंच तुमचं पुर्वायुष्य किती काळवंडलेलं आहे हे सदगुरु विचारीत नाहीत.

पुढचं आयुष्य जे सुंदर बनवतात,सत्याची उकल करतात,भगवंताची ओळख करुन देतात आणि मृत्युभयापासुन निवृत्त करतात. म्हणून जीवनात सदगुरु येणं म्हणजे खरी दिवाळी आहे. आनंदाचा प्रकाश देण्याची शक्ती सदगुरुंकडे आहे.संत मिराबाई राजकन्या होत्या.भौतिक सुखाला कमी नव्हती तरीही सदगुरुंकडुन ब्रम्हज्ञानाची प्राप्ती झाल्यावर त्या म्हणाल्या,पायोजी मैने रामरतन धन पायो।वस्तू अमोलक दी मोहे सतगुरु कर किरपा अपनायो।। सदगुरुंनी दिलेलं नामधन सर्व श्रीमंतीचा राजा आहे.ते मिळवण्यासाठी सर्वात जास्त तळमळ असली पाहिजे.
रामकृष्णहरी