Take a fresh look at your lifestyle.

पोपटराव पवार ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित !

राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्लीत सोहळा संपन्न.

नवी दिल्ली : सततच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करून अथक परिश्रम आणि लोकसहभागाच्या जोरावर जलसंधारण आणि पाणलोट क्षेत्रात हिवरे बाजारचे नाव देशाच्या नकाशात ठळकपणे झळकविण्यासाठी ग्रामविकासाचा ध्यास घेतलेल्या हिवरेबाजारचे उपसरपंच पोपटराव पवार यांना देशाचे महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या मानाच्या ‘पद्मश्री’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये राज्याच्या आदर्शगाव समितीचे कार्याध्यक्ष व हिवरे बाजारचे उपसरपंच पोपटराव पवार यांना २५ जानेवारी २०२०रोजी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला होता. त्यांनी ग्रामविकास, जलव्यवस्थापन, वृक्षलागवड आदी क्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेवून पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला होता. मात्र कोरोनामुळे पुरस्कार वितरण सोहळा लांबणीवर पडला होता.
आदर्श गाव हिवरेबाजार हे राज्यासह देशात प्रसिध्द आहे. या गावामध्ये विविध उपाययोजना दुष्काळात राबविल्या आहेत. गतवर्षी महाराष्ट्रातल्या तिघांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला होता. पोपटराव पवार यांच्यासह ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर आणि राहीबाई पोपेरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला होता.

पोपटराव पवार यांचे शिक्षण एम.कॉम.पर्यंत झालेले आहे. १९८९ साली हिवरे बाजार येथील पहिले तरुण सरपंच म्हणून निवडून आले. त्यानंतर गावातील मृद व जलसंधारण, आणि वनसंधारण या कामामध्ये स्वतःला झोकून देत गावाचा कायापालट केला. आज हिवरे बाजार पूर्णतः दुष्काळमुक्त झाले असून या राज्यात हिवरे बाजार पॅटर्न म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच त्यांनी पाणी फाऊंडेशन मध्ये देखील सहभाग घेतला. पाणी आणि स्वच्छता यापुरतेच मर्यादित न राहता पोपटराव यांनी अनेक सामाजिक विषयावर कार्य केलेले आहे. कोरोनाच्या संकट काळातही पोपटराव पवार यांनी हिवरे बाजारच्या माध्यमातून कोरोना मुक्त गावाचा नवा पॅटर्न देशाला दिला आहे.
‘पद्म’ पुरस्कार वितरण सोहळा आज राजधानी दिल्लीत पार पडला. यंदा सात मान्यवरांचा ‘पद्म विभूषण’, १० मान्यवरांचा ‘पद्मभूषण’ आणि १०२ जणांचा ‘पद्मश्री’ पुरस्कारासहीत गौरव करण्यात आला आहे. तर १६ जणांना मरणोत्तर ‘पद्म पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण पार पडले.
देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार ‘पद्म विभूषण’ प्राप्त मान्यवरांमध्ये दीर्घकाळापर्यंत जपानचे पंतप्रधान पद भूषणवणारे शिंजो आबे यांचाही समावेश आहे. पार्श्वगायक एस पी बालासुब्रमण्यम (मरणोत्त) यांना पद्म विभूषण तर आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई (मरणोत्तर), माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान (मरणोत्तर), आणि माजी लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांना ‘पद्वभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दरम्यान, पोपटराव पवार यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर हिवरे बाजार ग्रामस्थ व मित्रमंडळाच्या वतीने बुधवारी ( दि.१०) रोजी हिवरे बाजार येथे गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, देवगड संस्थानचे ह.भ.प. भास्करगिरी महाराज, ब्रम्हांडशास्त्री कॅप्टन अशोककुमार खरात, खा.डॉ.सुजय विखे पाटील, आमदार निलेश लंके आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.