Take a fresh look at your lifestyle.

आमदार निलेश लंके यांच्या पाठीशी हिमालयासारखा उभा !

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे अभिवचन.

 

पारनेर : तालुक्यातील मतदारांनी ज्या अपेक्षा आणि भावनेतून आमदार निलेश लंके यांना निवडून दिले त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण निलेश लंके यांच्या पाठीशी हिमालयासारखा उभा राहील असा विश्वास व्यक्त करीत कान्हूर पठार परिसरासह तालुक्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील कान्हूर पठार ते किन्ही या अडीच कोटी रुपयांच्या रस्त्याचे भूमिपूजन रविवारी पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.आमदार निलेश लंके कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष अशोक सावंत, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापू शिर्के माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र चौधरी, किसनराव रासकर, उद्योजक सुरेशशेठ धुरपते, पारनेर साखर कारखान्याचे माजी संचालक दादाभाऊ सोनावळे,अनिल देठे, विजुभाऊ औटी,अभिनव पतसंस्थेचे अध्यक्ष कैलास लोंढे, वीज वितरण समितीचे अध्यक्ष चंद्रभान ठुबे, अभयसिंह नांगरे, किरण ठुबे, सैनिक बँकेचे अध्यक्ष शिवाजी व्यवहारे, राष्ट्रवादीच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अध्यक्ष जितेश सरडे, ऍड. राहुल झावरे, संदीप चौधरी आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, पारनेर तालुक्यात रस्ते आणि पाण्याचा प्रश्न बिकट आहे या प्रश्नांबरोबरच राज्याच्या ग्रामविकास खात्याचा मंत्री आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपण यापूर्वीही आमदार लंके यांना विकासकामांबाबत सहकार्य केले असून पुढील काळातही मोठ्या प्रमाणात मदत करणार आहे. सोमवारी होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही आमदार लंके यांच्या पदरात झुकते माप टाकण्याचा आपला प्रयत्न आहे. आमदार लंके यांच्या विजयासाठी मतदारसंघातील मतदारांनी केलेल्या प्रयत्नांना कोणत्याही प्रकारे तडा जाऊ देणार नसल्याचे आश्वासनही पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिले.
कान्हूर पठार व परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.आमदार लंके यांनी कोरोनाच्या दोन्ही लाटेत केलेल्या कामाचे कौतुक करतानाच आमदार कसा असावा हे निलेश लंके यांनी देशाला दाखवून दिले आहे.सामान्य कुटुंबातील आमदार लंके हे जनतेच्या मनात आरूढ झाल्याचे गौरवोद्गारही पालक मंत्री मुश्रीफ यांनी काढले.
यावेळी बोलताना आमदार निलेश लंके म्हणाले की, कान्हूर पठार परिसरासह सोळा गावातील पिण्याच्या पाण्याची योजना विजबिलाअभावी बंद आहे, ही योजना सुरु करण्यासाठी पालक मंत्री मुश्रीफ यांनी सहकार्य करावे असे सांगताना पठारी भागाच्या एक टीएमसी पाण्याबाबत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी दोनदा बैठक झाली असून जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनाही शरद पवारांनी याबाबत निर्देश दिल्याचे सांगत आमदार लंके म्हणाले की, तालुक्यातील पुणेवाडी, कान्हूर पठार, जातेगाव या सिंचन योजना मार्गी लागल्यास शेतीच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटणार आहे. हे प्रश्न सोडविल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याचे आमदार लंके यांनी सांगितले. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती या निवडणुकीत तुम्ही मला साथ द्या तालुक्यात विकासाची गंगा आणल्याशिवाय राहणार नाही असेही आमदार लंके यांनी सांगितले.