Take a fresh look at your lifestyle.

बहुचर्चित मनोहरमामावर अखेर बलात्काराचा गुन्हा दाखल !

"त्या '' पिडित महिलेने मांडली कैफियत.

 

 

करमाळा : तालुक्यातील उंदरगाव येथील बहुचर्चित व वादग्रस्त मनोहर चंद्रकांत भोसले (वय 39) ऊर्फ मनोहरमामा याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. भक्त म्हणून त्याच्याकडे आलेल्या सातारा जिल्ह्यातील कोरेगांव येथील एका भक्त महिलेवर त्याच्यासह तिघांजणांनी बारामती व उंदरगाव येथे बलात्कार केला. यासंदर्भात कैफियत तिने सोलापूरच्या ग्रामीण पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे मांडली.

त्या तिघांनी सन 2018 पासून बारामती तसेच उंदरगाव येथील मठात बलात्कार केल्याचे तिचे म्हणणे आहे. त्यानुसार त्यांनी गंभीर दखल घेत करमाळ्याचे पोलिस उपअधीक्षक विशाल हिरे यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीनुसार मनोहरमामासह तिघांविरुद्ध गुरुवारी (दि. 9) करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मनोहर भोसले ऊर्फ मनोहरमामा, विशाल ऊर्फ नाथा वाघमारे व भैरव वाघ अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत.

मनोहर महाराजांच्या विरोधात बारामती पाठोपाठ करमाळ्यात बलात्काराचा अखेर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. गेले अनेक दिवसापासून या मनोहर मामाच्या विरोधात फक्त तक्रारीच दाखल होत होत्या. परंतु राजकीय वरदहस्त आणि बडी हस्ती असल्याने पोलिस प्रशासनही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करीत होते.

यासंदर्भात उपअधीक्षक विशाल हिरे म्हणाले, संबंधित महिलेने जिल्हा पोलिस अधिक्षक तेजस्विनी सातपुते यांच्याकडे याबाबत फिर्याद केली होती. यामध्ये पिडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आर्थिक व प्रापंचिक अडचणीमुळे ती व तिच्या पतीमध्ये सतत वाद चालू होता. त्यामुळे 2018 मध्ये संबधित महिला मनोहर भोसले महाराजांच्या बारामती येथील आश्रमात यावर तोडगा काढण्यासाठी गेली होती. त्यावेळी मनोहरमामाने त्या महिलेस थेट ‘तुझे एका व्यक्तींसोबत संबंध आहेत असे सांगितले. त्यामुळे ती महिला घाबरून गेली.

परंतु तुझे सर्व वाद, अडचणी मिटविण्यासाठी करमाळा तालुक्यातील उंदरगावातील आश्रमात तुला पाच वार्‍या करायला लागतील. त्यावर तोडगा काढायला लागेल, अशी भलावण मनोहरमामाने केली. त्यामुळे संबधित महिलेने उंदरगावातील आश्रमात पाच वाऱ्या केल्या. त्यावेळी या भोंदू महाराजाने व इतर दोन साथीदारांनी पिडीत महिलेकडून एक लाख वीस हजार रुपये लुबाडले. एवढेच नव्हे तर आश्रमातच एका ठिकाणी एकटीला बोलावून तिघांनी तिच्यावर अत्याचार केले.

या अत्याचारानंतर भयभीत झालेल्या महिलेने मनोहरमामाच्या वलयामुळे कोठेच याची वाच्यता केली नव्हती. उलट तिचीच बदनामी होईल म्हणून ती घाबरून होती. त्यामुळे तिचा मनोहरमामा गैरफायदा घेत होता.

परंतु मनोहरमामाचे बिंग फुटल्याने तिने तक्रारीचे धाडस केले. त्यासाठी तिने थेट पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांना गाठले. तिने मामाच्या अत्याचाराचा पाढा त्यांच्यासमोर वाचला. त्यानंतर त्यानुसार भोंदूगिरी करणा-या मनोहर चंद्रकांत भोसलेसह इतर तिघांवर 385, 376 (2) ड, 506 कलमांतर्गत सोलापुरात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर शून्य क्रमांकाने करमाळा पोलिसात हा गुन्हा वर्ग करण्यात आला याचा तपास वरीष्ठ पोलिस निरिक्षक सूर्यकांत कोकणे हे करीत आहेत.